
वसई |प्रतिनिधी ः शासनाचा डोंगर भरदिवसा पोखरून रस्ता तयार करणार्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत तहसिलदार उज्वला भगत यांनी दिले असून,तशी प्रत्यक्षात कारवाही ही सुरु करण्यात आली आहे.
वालीव येथील सर्वे क्र २६ मधील शासकिय गुरचरण जागेत दगडखाणीचा डोंगर होता.तो फोडून सर्वे क्र.५१ मधील धानीव औद्योगिक वसाहतीकडे जाण्याचा मार्ग तयार करण्याचा घाट काही अज्ञात इसमांनी सुरु केला होता.त्यासाठी जेसीबी,पोकलॅन,डम्पर अशा अत्याधुनीक वाहनांचा वापर करून काही दिवसांतच भलामोठा मातीचा रस्ताही तयार करण्यात आला.त्यामुळे शासनाची कोट्यावधी रुपयांची दगड-माती चोरीला तर गेलीच,रॉयल्टीही बुडाली आहे.इतके दिवस चाललेल्या या कारस्थानाकडे स्थानिक तलाठी,पोलीस आणि पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अखेर डोंगर वाचवण्यासाठी राजा मोहिते या जागरुक नागरिकांने २६ ऑक्टोबरला तहसिलदारांचे दार ठोठावले. तरिही रस्ता तयार करण्याचे काम जोमाने सुरु होते.
डोंगर पोखरून त्यातील दगड,माती चोरण्यात आली,त्यानंतर त्या जागेवर अतिक्रमण करून खाजगी वापरासाठी रस्ता तयार करण्यात आला.तरिही ंमहसुल विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात आले होते.अखेर नव्या तहसिलदार उज्वला भगत यांनी कारवाईचा बडगा उचलला.त्यांनी हा रस्ता मोठाले दगड टाकून गुरुवारी सकाळी हा रस्ता बंद केला.त्यानंतर पंचनामे करून डोंगर पोखरणारे,माती चोरणारे आणि अतिक्रमण करणारे यांचा तहसिलदार भगत यांनी सुरु केला.गुरुवारी रात्री उशीरा रात्रीपर्यंत ही कारवाई सुरु होती.तहसिलदार भगत यांनी धडक कारवाई केल्यामुळे या भुमाफियांचे धाबे दणाणले आहेत.त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे संकेतही भगत यांनी दिले आहेत.
सदर डोंगर प्रकरणी मंडळ अधिकार्यांनी पंचनामे करून अहवाल सादर केला आहे.तो पाहून संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यासंबंधी ठरवण्यात येईल-उज्वला भगत,तहसिलदार,वसई.
दरम्यान,तक्रारदार राजा मोहिते यांनी या प्रकरणाचा मुख्यमंत्री उद्घव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही या प्रकरणाचा पाठपुरावा सुरु केला आहे.उद्धवजींना आरे प्रकल्प वाचवला,तर आदित्यजींना पर्यावरणाची चांगली जाण आहे.त्यामुळे या दोहोंनी डोंगर गिळणार्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मोहिते यांनी केली आहे.