
कित्येक घरातील लहान मुले सुद्धा दोन दोन दिवस अन्नावाचून उपाशी ?
जगण्यासाठी पालघर जिल्हाधिकारी श्री कैलास शिंदे आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे मदतीची याचना ?
विरार पूर्व येथील विजय नगरचा परिसर निम्न मध्यमवर्गीय गरीब वस्तीमुळे ओळखला जातो. हातावर पोट असलेली कोकणातील, घाटावरील, उत्तर प्रदेशामधील अनेक कुटुंबे येथे निवाऱ्यास आलेली आहेत. रोजंदारीवर काम करणारी बहुसंख्य कुटुंबे येथे वास्तव्यास आहेत. लॉकडाउन मुळे हातावर पोट असलेल्या ह्या कुटुंबांचे अतिशय हाल सुरू आहेत.
बहुजन विकास आघाडीतर्फे परिसरात मोफत धान्याचे वाटप सुरू आहे. मात्र ज्यांच्याकडे त्या विभागातील रेशन दुकानावर नाव नोंदणी आहे आणि जवळ अंत्योदय व प्राधान्य रेशनकार्ड आहेत अश्याच कुटुंबांना हे धान्य उपलब्ध करण्यात येत आहे. आघाडीचे स्थानिक नगर सेवक ह्या धान्य वाटपावर बारीक लक्ष ठेऊन आहेत.
त्यामुळे इथले रेशनकार्ड नसलेल्या किंवा गावाकडील रेशनकार्ड असलेल्या गरीब नागरिकांची परवड सुरू आहे.
जवळ पैसे नसल्यामुळे दुकानातून धान्य विकत घेणे परवडत नाही आणि रेशनकार्ड नसल्याने रेशनवर मोफत धान्य मिळू शकत नाही. अश्या दुहेरी विवंचनेत इथली तब्बल साडेचारशे कुटुंबे सापडली आहेत. यातील कित्येक घरात चार चार दिवस चूल पेटलेली नाही.
बऱ्याच लोकांची इथल्या मतदार यादीत नावे नसल्याने त्यांची राजकीय उपयुक्तता शून्य आहे. त्यामुळे इथल्या नगरसेवकांना ह्या नागरिकांच्या उपासमारी बद्दल सहानुभूती नसल्याचे चित्र दिसून आले आहे
ह्या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी इथल्या नागरिकांनी पालघर जिल्हाधिकारी श्री कैलास शिंदे आणि वसई तहसीलदार किरण सुरवसे यांच्याकडे मदतीचा याचना केली आहे.