अनेक मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचा आरोप?

वसई- नालासोपारा पूर्वेच्या यादवेश विकास शाळेत १४ वर्षीय विद्यार्थीनीवर शाळेतील शिक्षकाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराचे तीव्र पडसाद उमटले आहे. मंगळवारी संतप्त पालकांनी शाळेबाहेर उग्र आंदोलन करून शाळा बंद करण्याची मागणी केली. शाळेत अनेक मुलींसह शिक्षिकांचे देखील लैंगिक शोषण झाल्याचा आरोप पीडित मुलीच्या भावाने केला आहे.

नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथे यादवेश विकास इंग्रजी शाळा आहे. आरोपी अमित दुबे (३०) हा या शाळेत शिक्षक आहे. तसेच तो वलईपाडा येथे उज्वल नावाचे खासगी शिकवणी वर्ग (क्लासेस) घेतो. दुबे यांने शाळेती १४ वर्षीय विद्यार्थीनीवर सतत ५ महिने लैंगिक अत्याचार करत असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पीडित विद्यार्थीनीला धमकावून तो शाळा आणि शिकवणी वर्गात (क्लासेस) बलात्कार करत होता. पीडितेच्या कुटुंबियांना हा प्रकार समजताच त्यांनी पेल्हार पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पेल्हार पोलिसांनी आरोपी शिक्षक अमित दुबे याला अटक केली आहे. हा प्रकार समजतात मंगळवारी सकाळी संतप्त पालकांनी शाळेबाहेर उग्र निरर्शने करून शाळा बंद करण्याची मागणी केली. शाळेच्या व्यवस्थापकाला पीडित मुलीने आऱोपी शिक्षकाकडून त्रास होत असल्याचे सांगूनही त्याने दुर्लक्ष केले आणि पीडितेला गप्प बसण्यासाठी सांगितले, असा आरोप मुलीच्या पालकांनी केला. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
———————
अनेक मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप
पीडित मुलीच्या भावाने शाळेच्या व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहे. यापूर्वी शाळेतील २० ते २५ मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप त्याने केला. शाळेतील शिक्षिका देखील या अत्याचाराला बळी पडली असून तिने शाळा सोडल्याचे त्याने सांगितले. माझ्या बहिण शाळेत बेशुध्द पडली मात्र शाळेने प्रकार दडवला आणि आरोपींना पाठिशी घातले. त्यामुळे शाळेच्या व्यवस्थापकावरही गुन्हे दाखल करून ही शाळा बंद करण्याची मागणी केली. पेल्हाप पोलिसांनी आरोपी अमित दुबे याला भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(२)(एफ) ६५(१) तसेच बालकांच्या लैंगिक अत्याचापासून संरक्षण (पोक्सो)च्या कलम ४, ५. ८ आणि १२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सध्या शाळा परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
———————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed