आज विज्ञान युगातही विधवा महिलांसाठी काही अनिष्ट प्रथा समाजात पाळल्या जात आहेत. समाजातील अशा काही अनिष्ट प्रथांमुळे विधवांना आपल्या उर्वरित आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. आपल्या पती मृत्यू पाश्चात्य पत्नीचे कुंकू पुसले जाते.बांगड्या फोडल्या जातात. सामाजिक तथा धार्मिक कार्यक्रमांमध्ये विधवांना योग्य मान दिला जात नाही. अशा अनेक अनिष्ट रुढी-परंपरा प्रथा समाजात आजही रुढ आहेत. आता अशा प्रथांना थारा न देता महाराष्ट्र राज्य शासनाने विधवा महिलांच्या बाबतीत नुकताच जीआर जारी करुन त्यासंदर्भातील परिपत्रक सर्व ग्रामपंचायतींना जारी केले आहेत. याची सुरुवात कोल्हापूर येथील हेरवाड ग्रामपंचायतीतून झाली आहे त्याचबरोबर आता कोकणात देखील या ऐतिहासिक निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात आहे. खरतरं ही समाजासाठी अभिमानास्पद आणि कौतुकास्पद बाब आहे. पतीच्या निधनानंतर विधवा महिलांवर वर्षांनुवर्षे सुरु असलेल्या अनिष्ट रुढी-परंपरा, चालीरीती बंद कायम झाल्याच पाहिजेत.कोल्हापूर येथील हेरवाड ग्रामपंचायत, दापोलीतील दमामे तामोंड ग्रामपंचायत, सिंधुदुर्गातील हुंबरट ग्रामपंचायत तसेच पुण्यातील खडकवासला येथील जवळपास २९ ग्रामपंचायतीने घेतलेला विधवा प्रथा बंद हा ऐतिहासिक निर्णय खरोखरच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद आहे. या शासन निर्णयाचे महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींनी तसेच गावकरी बंधू भगिनींनी स्वागत करुन प्रत्यक्ष अंमलबजावणी करुन विधवांना योग्य तो न्याय द्यावा असे आवाहन माहितीचा अधिकार मुंबई प्रसिद्धी प्रमुख तसेच सामाजिक कार्यकर्त्या तथा पत्रकार सौ.स्मिताताई भागणे यांनी यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.