

ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर ?
विरार(प्रतिनिधी)-वसई विरार महापालिका काबीज करण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली असून त्यानुसार मोर्चेबांधणी करण्यास सुरवात केली आहे.परंतु ही मोर्चेबांधणी करत असताना वरिष्ठांकडून पक्ष वाढीसाठी वर्षानुवर्षे झटणाऱ्या निष्ठावंताना सापत्य वागणूक मिळत असल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारची सापत्य वागणूक मिळत असल्याने विरार विभागात शिवसेनेत अनेक गट निर्माण झाले आहेत.अशा प्रकारच्या गटबाजीमुळे अनेक निष्ठावान कार्यकर्ते तसेच पदाधिकारी नाराज झाले आहेत.विशेष म्हणजे गेल्या १२ वर्षे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या जितेंद्र खाडये या कार्यकर्त्याच्या राजीनाम्याने ही नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. विरार विभागातील साईनाथ नगर येथील विभाग प्रमुख जितेंद्र खाडये यांनी शिवसेनेचे पालघर जिल्हाध्यक्ष वसंत चव्हाण यांच्याकडे आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे.दरम्यान जितेंद्र खाडये यांच्या राजीनाम्याने शिवसेनेतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.
राज्यात सत्ता स्थापन झाल्याने शिवसेनेने वसई विरार पालिका जिंकण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः जातीने लक्ष घालत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असलेले वसई विरार मधील काही पदाधिकारी आपापल्या गटातील कार्यकर्त्यांला नगरसेवकाचे तिकिट मिळवण्यासाठी सक्रिय झाले आहेत. त्यामुळे अनेक वर्षे पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणारे निष्ठावान नाराज झाले असून पक्षाला अखेरचा जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहेत.खाडये हे गेल्या १२ वर्षांपासून पक्ष वाढीसाठी काम करीत आहेत. अंतर्गत गटबाजी मुळे ते सद्या अस्वस्थ होते. याबाबत त्यांनी वरिष्ठांकडेही अनेक वेळा तक्रार केली होती. परंतु वरिष्ठांनीही कोणतीही दखल न घेतल्याने खाडये यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांचा या राजीनाम्यामुळे अनेक निष्ठावान कार्यकर्ते शिवसेना सोडण्याच्या तयारीत आहेत.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजीनाम्यानंतर खाडये हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे समजते.