प्रतिनिधी : विरार येथील वयोवृद्ध महिला शैला जगन्नाथ तांडेल यांची मालमत्ता हडप करण्याचा विकासकाचा डाव असून सदर विकासक त्यांना भयंकर मानसिक त्रास देत आहे. त्यांच्यावरील अन्यायाविरुद्ध त्यांनी विरार पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता पोलीस तक्रार घेत नसल्याचे शैला जगन्नाथ तांडेल यांनी म्हटले आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, शैला जगन्नाथ तांडेल यांची गाव मौजे विरार सर्वे नंबर १५ अ या भूखंडावरील राजीव पाटील चाळीमध्ये पहिल्या मजल्यावर खोली क्र. ५ ही १८० चौरस फूट कारपेट क्षेत्रफळाची निवासी भाडोत्री खोली आहे. सदर खोलीची भाडे पावती शैला जगन्नाथ तांडेल यांच्या नावे आहे. शैला जगन्नाथ तांडेल या निराधार विधवा महिला असून त्यांची सदरची मालमत्ता हडप करण्याचा विकासक किरण ठाकूर, प्रफुल्ल पाटील, प्रफुल्ल साने यांचा डाव असल्याचा आरोप शैला जगन्नाथ तांडेल यांनी केला आहे. सदर भूखंडावर विकासकांना टॉवर उभारावयाचा असून शैला जगन्नाथ तांडेल यांची मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न चालू आहे.सदर विकासक हे बहुजन विकास आघाडीवाले असून या लोकांची एवढी दहशत आहे की, पोलीस शैला जगन्नाथ तांडेल यांची तक्रार ही दाखल करून घेत नाहीत. त्यांनी सदर बाबत वसई न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यांनी न्याय मिळविण्यासाठी आगरी सेनेचे कैलास पाटील यांच्याकडे आपली तक्रार नेऊन त्यांची मदत मागितली आहे. कैलास पाटील यांनी याबाबत विडिओ प्रसारित करीत शैला जगन्नाथ तांडेल यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *