
वसई (प्रतिनिधी) विरार येथील 3 तलाठी कार्यालये व मंडळ अधिकारी यांची कार्यालये असलेली इमारत अनेक वर्षापासून जुनी असून जीर्णावस्थेत आहे. या कार्यालयात नागरीकांना 7-12 उतारे , फेरफार घेणे, कर्जाचा बोजा चढविणे , उतरविणे, विविध दाखले मिळविणे अशा शासकीय कामांसाठी जावे लागते. इमारत मोडकळीस आल्यामुळे कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांना जीव मुठीत धरून इमारतीत प्रवेश करावा लागत होता.
ही वस्तुस्थिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पुष्कराज वर्तक यांनी वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार कुलदीप वर्तक यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांची प्रत्यक्ष भेट घेउन त्यांना 1 फेब्रुवारी 2021 रोजी पत्र पाठवून या जीर्ण इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी विनंती केली होती. त्यानुसार मंत्री महोदय यांनी विषयांकित प्रकरणी उचित कारवाई करावी असे आदेश उपसचिव महसूल यांना दिले होते . तसेच मा.जिल्हााधिकारी पालघर यांना दि 17-1-2021 आणि 11-1-2022 रोजी मा.जिल्हा नियोजन समिती जिल्हा कार्यालय (DPO) यांना प्रत पाठवली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालय पालघर कार्यालयाकडून जावक क्र.जिनिस 0 / 2022 / फे / एएओ /02892 दिनांक 3-2-2022 च्या पत्रान्वये प्रशासकीय मान्यता आदेशानुसार नवीन इमारतीच्या बांधकामासाठी रू 93 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याबाबत शासकीय मान्यता प्रदान करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
