
नालासोपारा :- वसई तालुक्यात गेल्या कित्येक वर्षांपासून वीज चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असून या टोळ्या रात्रीच्या सुमारास वीज खांबावर आकडा टाकून वीज चोरी करतात. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी विरारच्या गोपचरपाडा परिसरातील दोन इमारतीत धाड टाकून मागील ९ महिन्यापासून होत असलेल्या वीज चोरीचा पर्दाफाश करत तब्बल ४८ जणांविरुद्ध शुक्रवारी विरार पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहे.
या वीज चोरावर नियंत्रण आणण्यासाठी आणि वीज चोरांवर कारवाई करण्यासाठी महावितरणच्या उच्चं अधिकाऱ्यानी भरारी पथक तयार करून त्या पथकाद्वारे कारवाई करण्यासाठी सुरुवात केली आहे. विरार येथील गोपचरपाडा परिसरातील लकी आणि जेडीएस अपार्टमेंटमध्ये आरोपींनी आकडा टाकून मेन इन्कमिंग वायरला टॅपिंग करून विनामीटर आपल्या घरातील विद्युत उपकरणांना जोडून महावितरणची वीज चोरी केली म्हणून सहाय्यक अभियंता अमेय रेडकर (२८) यांनी तक्रार देत ४८ जणांवर विरार पोलीस ठाण्यात शुक्रवारी दोन गुन्हे दाखल केले आहे. या ४८ वीज चोरणाऱ्या आरोपींनी २७ हजार ८७५ युनिटची तब्बल ४ लाख १४ हजार ८८० रुपयांची वीज चोरी करून महावितरणचे नुकसान केले आहे.
कुठे कुठे होते वीजचोरी
तालुक्यात सर्वात जास्त वीज चोरी नालासोपारा पूर्वेकडील संतोष भवन, गावराई पाडा, वालईपाडा, मोरेंगाव, नागिनदास पाडा, आचोळे डोंगरी विरार पूर्वेकडे कातकरी पाडा, चंदनसार, मनवेलपाडा, कारगिल नगर वसई पूर्वेकडे भोयदापाडा, नवजीवन, सातीवली, वालीव तर नायगांव पूर्वेकडील जुचंद्र, टाकी पाडा या विभागात होते. या विभागात अनधिकृत बांधकामे मोठ्या जोमाने सुरु असल्यामुळे आणि वीज चोरी करणाऱ्या टोळ्या याच विभागात कार्यरत असून या इमारतींना चोरीची वीज लोकांना वापरण्यास देतात. संध्याकाळ झाली कि विजेच्या खांबावर आकडे टाकून वीज चोरी केली जाते. या चोरीची वीज देणारे टोळ्या व झोपडपट्टी दादा एका घराच्या मागे तीनशे ते चारशे रुपये घेतात. या चोरी होणाऱ्या विजेचे पैसे वीज बिल भरणाऱ्याना भरावे लागतात. या विभागातील वीज खांब्यावर संध्याकाळ झाली कि विजेच्या आकड्यांचे जाळे पसरलेले असते.