
नालासोपारा(विनायक खर्डे) : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना वीर जिवाजी महालेंचे स्मारक प्रतापगडावर बांधण्यासाठी अखिल भारतीय जिवा सेनेने सोमवारी ७ मार्च २२ रोजी आझाद मैदानात एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असून जर याची दखल शासनाने न घेतल्यास आमरण उपोषणाचा इशारा अ.भा. जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगांवकर यांनी दिला आहे.
“होता जिवा म्हणून वाचला शिवा” हे वाक्य इतिहासात अजरामर झाले छत्रपती शिवाजी महाराजांवरील वार जर जिवाजी महालेनी परतून लावला नसता तर आज वेगळा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला असता. त्याच वीर जिवाजी महालेंच्या स्मारकासाठी काही नतद्रष्ट विरोध करीत आहेत.छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यासाठी अखिल भारतीय जिवा सेनेने गेल्या १९ वर्षापासून पाठपुरावा करते १४ /६ /२०१७ रोजी सह्याद्री अतिथीगृह मलबार हिल मुंबई येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी तत्कालीन मंत्री तथा ,समिती अध्यक्ष सुधीर मुंगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली त्यावेळी तीन जागा प्रस्तावित आहेत त्यातील एक जागा हि प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी वन उद्यान ०.१५ हि जागा,दुसरी प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या गाव मौजे कुंभरोशी तालुका महाबळेश्वर येथील सर्वे नंबर २६ ब क्षेत्र ०.१६ आर जागा महाबळेश्वर पोलादपूर रस्त्यावर आहे.व तिसरी जागा सर्वे नंबर १ ब व क्षेत्र ०.२७ आर हि अफझलखान कबरी जवळ आहे. प्रस्तावित करण्यात आलेल्या पहिल्या जागेस तेथील ग्रामस्थांनी विरोध केला आहे. दुसऱ्या जागेस ती जागा सार्वजनिक बांधकामाच्या मालकी असून ती जागा भविष्यात रस्ता रुंदीकरणामुळे प्रस्थापित जागा बाधित होणार आहे. तर तिसरी जागा हि अफझलखान कबरी जवळ असल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने योग्य नाही या सर्व बाबी तत्कालीन मंत्री तथा ,समिती अध्यक्ष सुधीर मुंगंटीवार यांना सातारा जिल्हाधिकारी यांचे प्रतिनिधी म्हणून तत्कालीन प्रांत अधिकारी यांनी माहिती दिली. त्यावेळी स्मारक समिती अध्यक्षांनी अखिल भारतीय जिवा सेना व स्मारक समिती मधील अशासकीय सदस्यांना ग्रामस्थांचा विरोध असलेल्या जागे बाबत ग्रामस्थांचे मत परिवर्तन करून त्यानुसार ग्रामपंचायतीचा ठराव शासनास सादर करण्यास सांगितले होते. दिनांक ७.९ .२०१७ रोजी प्रतापगडावर बैठक घेण्यात आली त्या बैठकीत ग्रामस्थांनी कोणतेही कारण न देता स्मारकाच्या विरोधात ठराव केला. त्याच वेळी जर सदर जागेस विरोध केल्यास सर्व संबंधितांची बैठक घेवून चौथ्या पर्यायी जागेचा शोध घेण्याची सूचना सातारा जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या. त्यानंतर सातारा जिल्हाधिकारी यांनी ५.१२.२०१७ रोजी चौथी जागा शिल्लक नसल्याचे पत्र विभागीय आयुक्तांना देवून आपले हात वर केले. आता याला ४ वर्षे उलटून गेली तरी शासनाला व ग्रामस्थांना छत्रपती शिवाजी महाराजांचे अंगरक्षक वीर जिवाजी महालेंचे वावडे आहे का ? असा सवाल अ.भा. जिवा सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद पिंपळगांवकर यांनी विचारला असून जो पर्यंत वीर जिवाजीं महालेंचे स्मारक होणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.






