

नालासोपारा : व्हिडीओकॉन तोट्यात गेल्यामुळे तिचे कामगार आता रस्त्यावर आले आहे. व्हिडिओकॉनच्या टेककेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने टॅक्समो आणि इन्फिनिटी या दोन कॉन्ट्रॅक्ट कंपनी बनवल्या असून यात वसई तालुका, मीरा भार्इंदर, पालघर आणि मुंबई येथील १६० कामगारांच्या परिवारावर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. पालघर जिल्ह्यातील तसेच वसई तालुक्यातील २५ कामगार भार्इंदर येथील सर्व्हिस सेंटरवर काम करीत आहे. पण अचानक तोट्यात गेल्यामुळे कंपनीत कामावर असणाऱ्यांना ७ महिन्यापासून पगार दिलाच नाही. ३० वर्षापेक्षा जास्त काळ या कंपनीमध्ये काम करणाºया कामगारांना आत दुसरीकडे काम मिळू शकत नसल्याने व वयोमर्यादा वाढल्यामूळे मजबुरीने कामावर जावे लागत आहे पण पगार होत नाही.व्हिडिओकॉन च्या टेककेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने टॅक्समो आणि इन्फिनिटी कंपनी मध्ये विविध ठिकाणी असलेल्या ब्रँंचमधील १०६ कामगारांच्या देशातील दिल्ली, आगरा अशा अनेक राज्यात एप्रिल २०१८ मध्ये बदल्या करण्यात आल्या आहेत. पण त्या कामगारांनी या निर्णयाविरोधात कोर्टात धाव घेतल्याचे सूत्रांकडून कळते आहे तर काही जण अन्यत्र कामाला लागले आहे.
तर काही जण घरी असल्याचेही कळते. व्हिडिओकॉन आणि टेककेअर कंपनीतील ४५ कामगार भार्इंदर, मरोळ, मुलुंड आणि वाशीमधील कंपनीच्या कार्यालयात दररोज कामावर जात आहे. पण कंपनी बंद झाली आहे की सुरू आहे हे कोणी सांगत नाही व कामही देत नाही. डिसेंबर २०१८ चा पगार १९ मार्चला २०१९ रोजी या कामगारांना देण्यात आला.
कंपनी कामगारांची जबदरस्तीने बदली करेल असे कळल्यावर या कामगारांनी मे २०१८ मध्ये कामगार न्यायालयाचा दरवाजा ठोठावत या बदल्यांना स्थगिती मिळवली. टॅक्समो आणि इन्फिनिटी या कंपनीमधील बदली केलेल्या १०६ कामगारांचा ३ महिन्याचा पगार कोर्टाने आदेश दिलेला असूनही अद्याप दिला नसल्याचे कळते. ९ कामगारांनी सेवानिवृत्ती आणि स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. या कामगारांना अद्याप ग्रॅच्युईटी, बोनस, रजांचा पगार दिलेला नाही. भविष्य निर्वाह निधी देखील अडकून पडला आहे.
काही कामगारांच्या नावात गडबड किंवा त्रुटी केल्यामुळे कामगारांना भविष्य निर्वाह निधी मिळत नसल्यामुळे ते हतबल झाले आहेत. कामगारांचा हिशोब मिळावा यासाठी बांद्रा येथील लेबल न्यायालयात केस सुरू असून तारीख वर तारीख सुरू असल्याने कामगारांना न्याय कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ या दरम्यान ४५ कामगारांचे पगार झाले पण त्यांच्या पगारातील ३० टक्के कंपनीची परिस्थिती खराब असल्यामुळे कापण्यात आल्याचे वरिष्ठांनी कामगारांना सांगितले व परिस्थिती सुधारल्यावर कापण्यात आलेले पगार परत देण्यात येईल पण तेही अद्याप दिलेले नाही.
व्हिडीओकॉन कंपनीने घेतले अनेक बँकांचे कर्ज
व्हिडिओकॉन कंपनीने मोठ्या प्रमाणात बँकांचे कर्ज घेतले होते. स्टेट बँक आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय अशा अनेक बँकेचे कर्ज घेतल्याचेही कळते. युपीएच्या काळात बँकांचे कर्ज मिळत गेले पण एनडीएची सत्ता आल्यानंतर हे सर्व कर्जाचे प्रकरण उघड झाल्यावर यावर चाप लावण्यासाठी व बँकांचे कर्ज परतफेड करण्यासाठी एनसीएलटी मध्ये धाव घेण्यात आली आहे. या तपासानंतर व्हिडिओकॉन कंपनीने विविध बँकांचे नेमके कितीचे कर्ज घेतले आहे हा आकडा निश्चित होईल.
गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीसाठी कामगार इमाने इतबारे काम करत आहे पण या कामगारांना आता या कंपनीने वाºयावर सोडून दिले आहे. सात महिन्यापासून पगार दिला नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
- शैलेश प्रधान, कामगार, नालासोपारा
व्हिडिओकॉन बंद झाली असून ती आता बँक चालवत आहे. व्हिडिओकॉनने आता स्वाबलंबन नावाची नवीन कंपनी उघडली असून बाकीच्या जुन्या कंपनीला बाजूला केले असून कामे नवीन कंपन्यांना देत आहे. - मुरारी सिंग राणा, कामगार, मिरा रोड