
जिल्हा परिषदेच्या महाआवास अभियान टप्पा 2 अंतर्गत शबरी आवास योजना मधील तब्बल 1516 घरकुलांना एकाचवेळी संगणकाच्या एका क्लिकवर ऑनलाइन मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही मंजुरी शुक्रवारी जिल्हा परिषद अध्यक्षा वैदेही वाढण व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद पालघर सिध्दाराम सालिमठ यांच्या हस्ते पार पडली.
डहाणू तालुक्यातील 256,जव्हार 211, मोखाडा 121,पालघर 244, तलासरी 198, वसई 160,विक्रमगड 166, तर वाडा तालुक्यातील 160 घरकुलांना यावेळी मंजुरी देण्यात आली. लाभार्थ्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन पूर्ण करून घेऊन त्याचे प्रस्ताव ऑनलाईन मंजुरीकरीता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाकडे सादर केले. प्रकल्प संचालक तुषार माळी यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांमुळे जिल्ह्याच्या एकूण 1767 उद्दिष्टाच्या 85 टक्के मंजुरी देणे शक्य झाले आहे. यंत्रणेने घेतलेल्या विशेष परिश्रमामुळे शबरी आवास योजनेतील लाभार्थ्यांचे घरकुलेचे स्वप्न पुर्ण होणार असल्याचे प्रतिपादन तुषार माळी यांनी केले आहे.
ऑनलाइन मंजुरीच्या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद पालघर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रतिभा गुरोडा, बांधकाम व वित्त सभापती शीतल धोडी, महिला व बाल कल्याण सभापती गुलाब राऊत, समाज कल्याण सभापती रामू पागी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती (सर्व) व सर्व विभागाचे खातेप्रमुख या वेळी उपस्थित होते.