

निर्मळ ( वसई) – ३० जानेवारी आपल्या भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी ह्यांची पुण्यतिथी.गेली अनेक वर्षे होली क्रॉस चर्च, निर्मळ तर्फे ह्या दिवसाचे औचित्य साधून शांती दिन साजरा करण्यात येतो. ह्या वर्षी देखील गुरुवार दि. ३० जानेवारी २०२० रोजी समाज सेवा मंडळ, निर्मळच्या प्रागंणात शांतीसभेचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम पेटत्या मेणबत्त्या हातात घेऊन नागरिकांनी निर्मळ नाक्यावरुन शांती रँली काढली होती.
या वेळी कार्यक्रमाचे आयोजक होली क्रॉस चर्चचे प्रमुख धर्मगुरू रे. फा. लुईस दिब्रिटो ह्यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करत कार्यक्रमाच्या आयोजनामागची संकल्पना स्पष्ट केली. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की, सर्वधर्मीय लोकांनी एकत्र येऊन शांती दिन साजरा करायचा, ही संकल्पना निर्मळकर ग्रामस्थ गेली काही वर्षे यशस्वीपणे राबवत आहे. यामुळे विविध धर्मातील विद्वेष कमी होऊन सलोख्याचे संबंध प्रस्थापित होतात. ह्या वेळी निर्मळ चर्चचे सहाय्यक धर्मगुरू रे. फा.ब्रँण्डन फुटर्याडो ह्यांनी महात्माजीच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली वाहिली.
जामा मशीद, वसईचे इमाम मौलाना अब्दुल सुभान खान यांनी आपल्या मनोगतात सांगितले की सर्व मनुष्य हे एकसमान असतात. मनुष्याने कोणा एका व्यक्तिची हत्या केली तर तो संपूर्ण समाजाची हत्या करतो. कोणा एका व्यक्तिला मदत केली तर तो संपूर्ण समाजाला मदत करत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शांतीचा आपल्या जीवनात अंगिकार केला पाहिजे.
स्वाध्याय परिवाराचे श्री. अनिल चोरघे ह्यांनी गांधीजींनी केलेल्या कार्याचा गौरव करीत गांधीजींच्या शिकवणीचा सर्वानी स्विकार केला पाहिजे, असे सांगितले.
आयु. पंढरीनाथ चव्हाण ह्यांनी शांतीचे समाजात असलेले महत्त्व स्पष्ट करत भगवान बुध्द ह्याच्या जीवनात असलेले शांतीचे स्थान विशद केले.
शांतीसभेचे प्रमुख वक्ते रे. फा. मायकल जी. ह्यांनी सद्यपरिस्थितीत असलेली शांतीच्या आवश्यकतेबद्दल अनेकविध उदाहरणे देत शांतीचे महत्त्व उपस्थितांना सांगितले. तसेच अन्याय सहन करणे, हे चुकीचे आहे. सर्वांशी न्यायाने वागणे म्हणजेच शांतीचा प्रसार करणे होय, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सदर शांतीसभा कार्यक्रमाला होली क्रॉस हायस्कूलचे मुख्याध्यापक रे. फा. मायकेल तुस्कानो, पर्यावरण संवर्धन समितीचे श्री. समीर वर्तक, पर्यावरणवादी श्री. शशी सोनावणे, समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. नेल्सन डिसोझा ह्याच्या सह परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नेल्सन दोडती ह्यांनी केले, तर आभार श्री. प्रसाद डाबरे ह्यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी रित्या आयोजित करण्यासाठी श्री. एलायस डिआब्रिओ, श्री. जॉकीम दोडती, श्री. रमेश क्रॉस्टो, श्री. रॉक डाबरे ह्यानी मोलाचे सहकार्य केले.
