
विरार (संजय राणे): कोविड-१९ मुळे उद्भवलेली परिस्थिती लक्षात घेता शाळांनी पालकांमागे फीसाठी तगादा लावू नये; अन्यथा शिवसेनेलाही शाळांविरोधात कठोर भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा शिवसेना पालघर जिल्हा उपप्रमुख निलेश तेंडोलकर यांनी दिला आहे.
कोविड-१८मुळे जगभरात सामजिक-आर्थिकस्थिती कोलमडलेली आहे. त्यानंतरही शाळांनी आपले सामाजिक भान विसरून पालकांमागे विद्यार्थ्यांच्या शालेय फीसाठी तगादा लावला आहे.
वसई-विरारमधील अनेक शाळांनीही पालकांना एसएमएस व खाते क्रमांक पाठवून पाल्याची फी भरण्यासाठी तगादा लावला आहे. याबद्दलच्या अनेक तक्रारी आपल्याकड़े आल्या आहेत, अशी माहिती निलेश तेंडोलकर यांनी दिली.
कोविड-१९ मुळे अनेक पालक घरी आहेत. काहींची नोकरीही गेली आहे. परिणामी त्यांच्यासमोर आर्थिक आणीबाणी निर्माण झाली आहे. अशा आर्थिक संकटात शाळांनी फीसाठी जोरजबरदस्ती आणि मनमानी करणे माणुसकीला धरून नाही, असे निलेश तेंडोलकर यांचे म्हणणे आहे.
त्यामुळे तेंडोलकर यांनी; शाळांना फीबाबत सामंजस्याची भूमिका घेण्याची विनंती केली आहे.
शाळा चालकांनाही आर्थिक चणचण भासू शकते; परंतु या परिस्थितीत ज्यांना फी भरणे शक्य आहे; त्यांनी ती भरावी. पण ज्यांची आज फी भरण्याची परिस्थितीच नाही; त्यांनी काय करावे? असा सवाल करतानाच; जर या मानसिक अस्वस्थतेत, काळजीत एखाद्या पालकाने आत्महत्या केली तर याची जबाबदारी शाळेची राहील, याचे खबरदारीही शाळांना घ्यावी लागेल, असे मत निलेश तेंडोलकर यांनी व्यक्त केले आहे.
शालेय मुलांच्या भविष्याबाबत शिवसेना अत्यंत गंभीर असून यात कोणतीही शाळा चालकांची दादागिरी, दमबाजी सहन केली जाणार नाही, असा इशारा सरतेशेवटी तेंडोलकर यांनी दिला आहे.