

मुंबई – लॉकडाऊन काळात तुमच्या पाल्यांची शाळा जर शुल्कासाठी तुमच्यावर दबाव आणत असेल तर तुम्ही तक्रार करू शकता. शिक्षण विभागाने यासाठी एक यादीच जाहीर केली आहे आणि नोडल अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. युवा सेनेने शिक्षण विभागाकडे पालकांसाठी एक हेल्पलाइन सुरू करण्याची मागणी केली होती. जेणेकरून या हेल्पलाइनवर पालक शुल्काविषयीच्या तक्रारी नोंदवू शकतील.
शाळा फी भरण्यासाठी दबाव आणत असेल किंवा शुल्कवाढ करत असेल तर कोणाकडे तक्रार करायची हे पालकांना कळत नव्हते. लॉकडाऊन असल्यामुळे शिक्षण विभागाची कार्यालयेदेखील बंद आहेत. म्हणूनच शुक्रवारी शिक्षण विभागाने एक यादी जाहीर केली यात राज्यभरातील ३७ जिल्ह्यांतील ८७ नोडल अधिकाऱ्यांची नावे आणि संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.शुल्कासंबंधी कोणतीही तक्रार या नोडल अधिकाऱ्यांकडे करता येणार आहे. ही यादी लवकरच शालेय शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावरदेखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे.