
शिवसेना वसई तालुका सहसचिव अजीत खांबे शिंदे गटात सहभागी!
आगामी घडामोडींकडेही वसईकरांचे लक्ष



प्रतिनिधी
विरार- शिवसेना वसई तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर, उपजिल्हा प्रमुख नवीन दुबे यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिवसेना वसई तालुका सहसचिव अजीत खांबे हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले आहेत. मंगळवारी खांबे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपले समर्थन दिले आहे.
नालासोपारा पूर्व भागात अजीत खांबे सक्रिय आहेत. नालासोपारा येथील विजय नगर, राधानगर आणि इतर परिसरात त्यांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते.
बौद्धजन पंचायत समितीचे गटप्रतिनिधी आणि वसई तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष असल्याने या समाजात त्यांना मोठे स्थान आहे. त्यामुळे अजीत खांबे यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या मागे या परिसरातील एक मोठा वर्ग उभा राहील, अशी शक्यता आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे गटात संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसेना विभागली गेल्यानंतर या सत्तांतराला पालघर जिल्हाही अपवाद राहिलेला नाही. एकनाथ शिंदे आणि आमदार रवींद्र फाटक यांचे प्रभाव क्षेत्र राहिलेल्या वसई, नालासोपारा, विरार भागात याचे परिणाम कसे होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले होते.
त्यात वसई तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाप्रमुख नवीन दुबे, उपतालुका प्रमुख दिवाकर सिंग, माजी नगरसेवक बाळू कांबळे आणि बहुजन विकास आघाडीतून नुकतेच शिवसेनेत प्रवेशकर्ते झालेले सुदेश चौधरी यांनी एकनाथ शिंदे गटात जाणे पसंत केले होते.
या सगळ्यांच्या तुलनेत शिवसेना वसई तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर हे शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक मानले जात होते. तब्बल ३० वर्षांहून अधिक काळ त्यांनी शिवसेनेकरता दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्या विचार बदलाला विशेष महत्त्व आलेले आहे.
तीन दशकाहून अधिक काळ वसईतील शिवसेनेत सक्रिय राहिल्याने ते आपली सर्व ताकद एकनाथ शिंदे यांच्या मागे लावतील, अशी शक्यता आहे. याचाच भाग म्हणून त्यांनी अजीत खांबे यांनाही एकनाथ शिंदे यांच्या मागे उभे केले असल्याचे सांगितले जाते. पुढील काळात आणखी कोणकोण शिंदे गतासोबत जातात; की पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत निष्ठेने राहतात, याकडे वसईतील शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे.
.