
नालासोपारा पूर्वेतील नागरिकांचे कोविड-१९ लसीकरण प्राधान्याने करणार!

पालिका मुख्य वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी यांची माहिती
प्रतिनिधी
नालासोपारा- नालासोपारा पूर्वेकडील नागरिकांच्या कोविड-१९ लसीकरणाला प्राधान्य देण्यात येईल. याकरता या भागातील कोविड लसीकरण केंद्र वाढण्यात येतील, असे आश्वासन वसई-विरार महापालिकेच्या मुख्य प्रभारी वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी व उपायुक्त ड़ॉ. विजयकुमार द्वासे यांनी दिले.
नालासोपारा पूर्वेकडील नागरिकांच्या लसीकरणाकडे पालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याबाबत शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण व युवा नेते पंकज देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली होती. पालिका अधिकाऱ्यांच्या या बेजबाबदारपणाविरोधात निदर्शने करण्याचा इशाराही या दोघांनी दिला होता.
या इशाऱ्यानंतर महापालिकेच्या मुख्य प्रभारी वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी व उपायुक्त ड़ॉ. विजयकुमार द्वासे यांनी शिवसेना युवा नेते पंकज देशमुख यांना तात्काळ चर्चेकरता निमंत्रित करून त्यांच्या मागणीबाबत सकात्मकता दर्शवली.
नालासोपारा पूर्व तुळींज, महेश पार्क, सेंट्रल पार्क, जिजाई नगर, विजय नगर, मोरेगांव, रहमत नगर, लक्ष्मी नगर हा दाट वस्तीचा भाग आहे. कोविड-१९ चा प्रभाव आजही कमी झालेला नाही. या भागातील वर्दळ आणि गर्दी लक्षात घेऊन या भागात कोविड-१९ लसीकरण प्राधान्याने करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण व युवा नेते पंकज देशमुख यांनी केली होती.
या मागणीवर मुख्य प्रभारी वैद्यकीय अधिकारी भक्ती चौधरी व विजयकुमार द्वासे यांनी सकारात्मक दर्शवली आहे. उपरोक्त भागांसोबतच संतोष भुवन, धानिव व बिलाल पाड़ा भागांतही कोविड-१९ लसीकरण केंद्र वाढवण्यात येतील, असे आश्वासन चौधरी यांनी दिले आहे.
विशेष म्हणजे या भागांतील नागरिकांच्या लसीकरणाकरता अभ्यास गट निर्माण करून; तात्काळ या भागांचे सर्वेक्षण पालिकेकडून करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्याची माहिती शिवसेना युवा नेते पंकज देशमुख यांनी दिली.
दरम्यान; या चर्चेकरता शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख शिरीष चव्हाण व वसई तालुका प्रमुख निलेश तेंडोलकर यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभल्याचे पंकज देशमुख म्हणाले.