
दि. १४: कृषी बाजार समित्या आणि पर्यायाने सहकार क्षेत्राला मोठा धोका निर्माण झाला असून या कायद्यामुळे नवीन आणि मल्टी नॅशनल कंपन्यांना साठेबाजी करण्यास मोकळे रान मिळणार आहे. शेतकऱ्यांकडून कमी किंमतीत शेतीमाल खरेदी करून साठेबाजी करायची आणि चढ्या भावाने अन्न धान्य खरेदी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना विकून त्यांचे कंबरडे मोडनारा हा कायदा आहे असे शेतकऱ्यांना संबोधित करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन म्हणाले. शेतकरी आणि सर्वसामान्य कष्टकरी मजूरवर्ग यामुळे देशोधडीला लागण्याची भीती आहे. शेतकरी, शेतीशी निगडित शेतमजूर, आडती कामगार, कष्टकरी, कर्मचारी आणि लाखों गोरगरीब लोकांचे मोठे नुकसान होणार आहे. म्हणून शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा या काळ्या कायद्यास प्रखर विरोध आहे असे मुजफ्फर हुसेन म्हणाले.
संपूर्ण राज्यात एकाच वेळी शेतकरी आणि नागरिकांशी व्हर्चुअल रॅलीद्वारे संपर्क साधत काँग्रेसचे दजगाज नेते राजीव सातव, राज्याचे मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, काँग्रेसचे राज्य प्रभारी एच. के. पाटील, संजय पाटील, जितेंद्र देहाडे, प्रदीप रांका, रवींद्र दरेकर, अतुल कोटेचा, श्याम उमाळकर, अमोल देशमुख, मृणाल पाटील आदींनी मार्गदर्शन केले.
शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारा मोदी सरकारचा नवीन कायदा असल्याचे वसई विरार जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा म्हणाले. नवीन कायद्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन आणि उत्पन्नावर भयंकर परिणाम होणार असून केंद्रातील मोदी सरकारने संमत केलेले कायदे हे शेतकरी, कष्टकरी शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिकांविरोधी आहेत असेही ते म्हणाले.
काल गुरुवार दि. १५ रोजी कै. अण्णासाहेब वर्तक सभागृह, काँग्रेस भवन, पारनाका, वसई ब्लॉक, नालासोपारा ब्लॉक येथे दोन ठिकाणी, बोईसर विधानसभा क्षेत्रात विरार फाटा आणि विरार ब्लॉकतर्फे पूर्वेला अशा चार ठिकाणी जिल्हा काँग्रेसने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्हर्चुअल रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष आणि कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी अथक परिश्रम घेतले.
काँग्रेसने या व्हर्चुअल रॅलीद्वारे देशात, राज्यात आणि पालघर, वसई विरार जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात काँग्रेस कार्यकर्ते शेतकरी, कष्टकरी शेतमजूर आणि सामान्य नागरिकांना जोडले अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी दिली.
राज्यातील पाच ठिकाणी आणि पालघर जिल्ह्यातून काँग्रेस भवन, पारनाका, वसई येथे दोन्ही मजल्यांवर ५०० शेतकऱ्यांनी उपस्थिती दर्शवली. वसईतून प्रदेश काँग्रेसचे राजेश शर्मा, मुजफ्फर हुसैन, डॉ. गजानन देसाई आदी बड्या नेत्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
किसान रॅलीद्वारे शेतकरीविरोधी विधेयकास जोरदार विरोध प्रदर्शन करून त्याचे थेट प्रक्षेपण एकाच वेळी संपूर्ण राज्यात आणि कोंकणात केले गेले.
या शेतकरी आणि गरीब शेतमजूर यांच्या हितासाठी महात्मा गांधींच्या मार्गाने, शांततेने आणि कोरोना काळातील नियमांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी सभागृह खचाखच भरले होते. मंचावर काँग्रेस नेते काँग्रेसचे युवा नेते पुष्कराज वर्तक, महिला जिल्हाध्यक्षा प्रवीणा चौधरी, सेवादल रतन तिवारी, अल्पसंख्यांकचे अर्षद डबरे, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, ब्लॉक अध्यक्ष राजू गव्हाणकर आदी उपस्थित होते.