
महाराष्ट्राचा खरा इतिहास कुठे असेल तर तो सहयाद्रीच्या कुशीत, याच सह्याद्रीत उभारलेल्या गडकोट किल्ले प्राचीन मंदिरे या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्यासाठी आपली राज्यसत्ता टिकवून ठेवण्यासाठी अनेक युद्ध या सह्याद्रीच्या कुशीत झाली, यापैकीच प्राचीन काळी सागरी मार्ग, सागरी जलवाहतूक व घाटमार्ग वापरात होते. शेकडो वर्षे चालणाऱ्या व्यापाराला सुरक्षा म्हणून अनेक किल्यांची उभारणी केली गेली, त्यापैकीच एक म्हणजे रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील प्राचीन बंदराचा रक्षक म्हणजे किल्ले द्रोणागिरी.
जसजसा काळ बदलत गेला गडकिल्ले जनजागृती होऊन त्यांचे जतन संवर्धन होऊ लागले त्यापैकीच द्रोणागिरी किल्याच्या रक्षणासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत पण स्थानिक शिवप्रेमी इतिहासप्रेमी ग्रामस्थ यांच्या पुढाकाराने या किल्याच्या रक्षणासाठी एक हक्काने जबाबदारीने पाऊल पुढे आले ते म्हणजे शिवराज युवा प्रतिष्ठान ,महाराष्ट्र राज्य ही संस्था गेली कित्येक वर्षे विविध कार्यात सक्रिय असणारी संस्था आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील गडकोट रक्षणासाठी संवर्धन कार्य सातत्याने द्रोणागिरी गडावर करत आहे.आधार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन प्रमुख ,हिंदवी स्वराज्य गडकोट रक्षक ,अपरिचीत गडकोट अभ्यासक जयकांत दादा शिंक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शोध मोहिमेद्वारे गडाचे अपरिचित वास्तू शोधून त्या जतन व संवर्धन केल्या जात आहेत. त्यापैकी आज मोठे यश शिवराज युवा प्रतिष्ठान या परिवाराच्या हाती लागले आहे. गेली कित्येक महिने शोध कार्य करून पाण्याचे टाके, हौद, काही ऐतिहासिक वास्तू यांचा शोध घेत असताना ,अजून एक खूप मोठा ऐतिहासिक पुरावा हाती लागला, उरण द्रोणागिरी परिसरातील शिवराज युवा प्रतिष्ठान च्या मावळ्यांनी याच परिसरातील एका ठिकाणी १०८ किलो वजनाचा ,पूर्ण लोखंडी, वातीची सोय असणारा ,३३सेमी उंची,१०६ सेमी व्यासाचा एक प्राचीन तोफगोळा हाती लागला आहे ,त्याच्या आत दारुगोळा भरण्यासाठी जागा आहे, पूर्वी त्यात दारूगोळा ठासून भरला जात असे. या गोळ्यांचा थोडक्यात इतिहास असा की करंजा घारापुरी उरण या ठिकाणी असणाऱ्या प्राचीन द्रोणागिरी किल्यावर हल्ला केल्याच्या हा एक पुरावा आहे,, तसेच १२ व्या शतकाच्या शेवटी उत्तर कोकणचे शिलाहार शेवटचा राजा सोमेश्वर व महादेव यादव यांच्यात घनगोर युद्ध याच समुद्र किनारी झाले, त्यावेळी सुद्धा अश्या तोफगोळा वापरल्याचे दिसून येते, कडीच्या आकाराचे गोळे अल्लउद्दिन खिलजी व शिलाहार या काळात काही ठिकाणी दिसून येतात.
आज असे तोफगोळे पाहायला मिळणे दुर्मिळ झाले आहे ,असा ऐतिहासिक ठेवा जतन करणे काळाची गरज आहे, हा तोफगोळा याची नोंद स्थानिक पोलीस ठाणे व पुरातत्व खाते याना देत आहोत.प्रशासनाने त्याची योग्य नोंद घेऊन त्याचे जतन करावे ही शिवराज युवा प्रतिष्ठान परिवाराची सर्व इतिहासप्रेमी यांची विनंती आहे.