
संत गोन्सालो गार्सिया कॉलेज वसईतील ग्रामीण विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सौ.आशा चव्हाण जि. प.सदस्य, पालघर, सौ. अनिता जाधव पं. स. सदस्य, प्रमोद जाधव, बँक व्यवस्थापक, वसई विकास सहकारी बँक, आगाशी शाखा, सामाजिक कार्यकर्ते, विजय भुरे, शरद राणे,अभियंता मुंबई विद्यापीठ उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमनाथ विभुते, उप-प्राचार्य प्रा.सरिथा कुरियन व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामदास तोंडे यांची उपस्थिति होती. मान्यवरांच्या हस्ते दीप-प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्राचार्यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामीण विकास विभाग प्रमुख डॉ. अरुण माळी यांनी केले. त्यांनी कार्यक्रमा विषयीची भूमिका विशद केली.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.विभुते म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात सुरू आहे. अनेक उपक्रम देशभर राबवले जात आहेत.महात्मा गांधी म्हणाले होते, खेड्याकडे चला,आपण याउलट खेड्याकडून शहराकडे प्रवास सुरू केला. आपण गांधीजींचे ऐकले नाही. त्यामुळे आजचे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत. देशाच्या प्रगतीमध्ये सर्व जाती-जमातींचे योगदान आहे.आदिवासी बांधव मूळ निवासी आहेत. खरंतर ते या देशाचे मालक आहेत. त्यांना बरोबर घेऊन जर विकास आपल्याला साधता आला तरच आपण शाश्वत विकासाच्या दिशेने जाऊ. यासाठी रामायण, महाभारत आणि आधुनिक काळातील काही दाखलेही त्यांनी दिले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मातृभूमीच्या संरक्षणासाठी आदिवासींनी फार मोठे योगदान दिलेले आहे. क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा उल्लेख करत त्यांनी राणी दुर्गावती यांच्या बलिदानावर प्रकाश टाकला. मोगलांविरुध्द झालेल्या युध्दात गोंड आदिवासी राणी दुर्गावतीचा अतुलनीय पराक्रम, शौर्य व स्वाभिमान सभागृहात त्यांनी जिवंत केला. अक्षरश: अंगावर शहारे उभे करणारा तो युद्धप्रसंग होता. ते बोलले की, आपला हा सर्व इतिहास आपण विसरत चाललो आहोत. इतिहास विसरू नका त्यातून प्रेरणा घ्या आणि पुढे जा. भविष्याची वाट वर्तमान काळातून चालत असताना भूतकाळातले बंध जे आहेत ते आपण तोडले तर आपला प्रवास अपूर्ण राहील हा सावधानतेचा इशाराही त्यांनी दिला. प्रमोद जाधव यांनी ‘पेसा’ कायद्याबद्दल माहिती दिली व सांगितले की, आदिवासी मुला-मुलींनी आपल्या अधिकारांविषयी जागरूक असले पाहिजे. आशा चव्हाण युवकांना संबोधित करताना म्हणाल्या, आदिवासी विद्यार्थ्यांनो उच्च शिक्षण घ्या, पुढे जा आणि तुमचे अस्तित्व घडवा. केवळ नोकरीच्या मागे न लागता व्यवसायातील संधी शोधा. कुणाली पांढरा, ज्योति व अंजली या विद्यार्थिनींनी आदिवासी समाज व संस्कृती विषयी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आदिवासी शेतकरी नृत्य व ‘तारपा’ नृत्य उत्तमरीत्या सादर केले.
सूत्रसंचालन सोनल पावर हिने केले तर आभार डॉ.रामदास तोंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विविध विभागाचे प्राध्यापक डॉ. नंदकुमार झांबरे, डॉ.अनिल सोनावणे, प्रा.जिमोल मॅथ्यू, डॉ.मोनिका पेनकर प्रा. सेबेस्टियन रिबेलो,
प्रा. सुचित म्हात्रे, ग्रामीण विकास विभागाचे व एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.