
गेल्या वर्षी माझ्यापहिल्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.प्रकाशन सोहळ्यात पवार सरांना मला व्यासपीठावर बसवायचे होते.त्यांची संमती घेण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो. पवार सर(लक्ष्मण बंडु पवार) उठण्याबसण्याच्या पलीकडे गेले होते.क्रुश झालेले त्यांचे अगतिक शरीर पाहुन मला फार दु:ख झाले.माझी एक ईच्छा अपुर्ण राहिली.
पवार सर आमच्या शाळेतील एक राजबिंड व्यक्तिमत्त्व.त्यांचा आवाज,चालणेबोलणे,चारित्र्य सारे काही विलोभनीय होते.आमच्या पापडी येथील थाँमस बँप्टिष्टा हायस्कुल मधील ते एक प्रभावी व्यक्तिमत्त्व होते.त्यामुळे सार्या शिक्षकांत ते उठुन दिसत.शाळेतुन निव्रुत्त होईपर्यंत त्यांचा हा दबदबा टिकुन होता.
पवार सरांचा संबंध शाळेच्या शेवटच्या दोन तीन वर्षात येई.तोपर्यंत त्यांच्याबद्दल ईतके आदराचे शब्द कानी येत की कधी एकदा पवार सर आम्हाला शिकवायला येतात याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असु.सर शारीरिक शिक्षणाचे वर्ग घेत.पण क्वचित.ते मराठी शिकवित.ते देखील शेवटच्या दोन,तीन वर्षात.एकच गोष्ट सांगतो असे सांगत ते विषयाची सुरवात करीत.शब्द उच्चारण्याच्या त्या विशिष्ट लकबीचा नंतर आम्ही सराव करीत.त्यातुन हास्याचे फवारे उडत.उपप्राचार्य म्हणुन त्यांचा दबदबा मोठा होता.शाळेचे व्यवस्थापन ते चालवित असे म्हटले तर अतिशयोक्त ठरणार नाही. प्राचार्यांना एव्हढा दिलासा क्वचित कोणी देवु शकेल.
त्यांच्या राजबिंड स्वभावाचे मला विशेष आकर्षण होते.आपपसात वादविवाद करणे त्यांना ठाऊक नव्हते.चेहर्यावर लष्करी भाव.पण मनाने कोमल.शिस्तीमध्ये चोख.पण कुणाला दुखवणे नाही.व्यवस्थापनात हजार ताप.पण प्रत्येकाशी सभ्य वागणुक.शिकवताना खोलात जाऊन शब्दांची ताकद दाखविणार.पण अहंमभाव नाही. असा त्यांचा स्वभाव होता.म्हणुन शेवटपर्यंत पवार सरांना सगळ्याकडुन आदर मिळत गेला.पवार सर असे एक व्यक्तिमत्त्व होऊन गेले. कोणत्याही विद्यार्थ्याची त्यांच्याबद्दल तक्रार नव्हती.
मला त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा झाला.बिएस्सी झाल्यानंतर सहा महिने मी माझ्या शाळेत नोकरी केली.त्यावेळी शाळेचे सगळे व्यवस्थापन पवार सर चालवीत.मी शिकवताना मुलांना शिक्षा करी.शिक्षेचे वेगवेगळे प्रकार मी शोधुन काढले होते.कुणीतरी पवार सरांना तक्रार केली असावी.एक दिवस ते अचानक माझ्या वर्गात आले.मी दोन मुलांना शिक्षा फर्मावली होती.ओणवे राहुन दोन्ही हाता आणि पायावर उभे राहण्याची सजा मी सुनावली होती.सरांनी ताबडतोब ती शिक्षा रद्द केली.नंतर दुपारी मला त्यांच्या खोलीत बोलावुन घेतले.मला सांगितले कधीही अशा शिक्षा करीत जाऊ नका.या कडक शिक्षा आहेत.बसं तेव्हढेच.त्याचा माझ्यावर मोठा परिणाम झाला.त्यानंतर मी मुलांना कधीही शिक्षा केली नाही.पुढे आयुष्यात मला त्याचा फार फायदा झाला.
वैयक्तिक जिवनात मात्र पवार सर तेव्हढे भाग्यशाली नव्हते.शाळेने त्यांना भाड्याने खोली दिली.परंतु त्यांच्या उत्कृष्ट सेवेकडे कानाडोळा करुन तत्कालिन प्राचार्यांनी त्यांच्याकडुन ती खोली काढुन घेतली.त्यामुळे त्यांना घराची सोय करावी लागली.भाबोळयात मोठ्या हौशेने घर बांधले.पण घरावर दोनवेळा दरोडा पडला.त्यानंतर काही काळ ते घर रिकामी पडले होते.सरांना आणि त्यांच्या कुटुंबियांना फार मोठ्या मारहाणीतुन आणि आर्थिक नुकसानीतुन जावे लागले.पण सरांनी चांगुलपणा कधी सोडला नाही.त्यांच्या कणखर चेहर्यावरील हास्याची लकेर त्यांनी कधी मावळु दिली नाही.याला कारण कोण हे ठाऊक असुनही त्यांनी कधी त्यांचा शालीनपणा सोडला नाही.ख्रिस्ती शाळेत शिकणारे आणि शिकवणारे काही जण ख्रिश्चनांच्या बाबतीत बरेच गैरसमज करुन असतात किंवा पसरवितात.पण पवार सरांनी कधीही चुकुन तसे वर्तन केले नाही.त्यांच्या राजबिंड स्वभावाचे ते दर्शन होते.
आमच्या कुटुंबाशी त्यांचे घनिष्ठ कौटुंबिक संबंध होते.आमच्या उन्नतवर त्यांचे कमालीचे प्रेम होते.खास त्याला भेटायला येत.येताना त्याच्यासाठी गुलाबजामुन घेऊन येत.नानांवर त्यांचे भारी प्रेम.नानांवर अनेकांनी प्रेमाचा वर्षाव केल्याचे मी पाहिले आहे. पवार सरांचे नानावरील प्रेम काही जगावेगळे होते.नाना त्यांच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान.पण सर त्यांना मोठा भाऊ मानीत.माझे बंधु थाँमस जेव्हा बिशप झाले तेव्हा सरांना झालेल्या आनंदाने आम्ही हरकुन गेलो होतो.येताना गुलाबजामुनची अख्खी पेटी घेऊन आले होते.पवार सर दिलखुलास हसतात देखील हे तेव्हा मला कळले.आमचे दादा फार मोठा माणुस आहेत असे ते म्हणत.त्यामुळे मला दादांचा फार अभिमान वाटे.माझ्या वहिनी कँथरीन आणि डाँमनिका त्यांच्या सह शिक्षिका.पवार सरांबद्धल त्यांना खुप आदर होता.त्यामुळे अखेरीपर्यंत त्या पवार सरांची विचारपुस करण्यास त्यांच्या घरी जात.जणुकाही सरांच्या समर्पित जीवनाबद्दल त्यांनी वाहिलेली ती सुमने म्हणावी.
पवार सरांचे कुटुंब एक आदर्श कुटुंब आहे.त्यांच्या पत्नीही आदर्श शिक्षिका होत्या.निव्रुत्त जिवनात एकमेकांच्या संगतीत त्यानी दरदिवशी मारलेला फेरफटका माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला.चालण्याची लागलेली गोडी त्यांच्यामुळे मला प्राप्त झाली.चार वर्षापुर्वी विजया पवार मँडम निघुन गेल्या.तेव्हापासुन पवार सरांनी अखेरपर्यंत अंथरुण धरले.काल सायंकाळी त्यांनी या जगाचा निरोप घेतला.त्यांच्या तिन्ही मुलांनी अनिल,अजित आणि साधना यांनी सरांचा वारसा पुढे चालवला आहे.धाकटा मुलगा अजित याने व त्याच्या पत्नीने अखेरच्या काळात त्यांची मोठी सेवा केली.
पवार सरांसारखी माणसे जेव्हा आपल्यातुन निघुन जातात तेव्हा आपण फार काही गमावलेले आहे असे राहुन राहुन वाटते.त्यांना मरणोपश्चात अमर जीवन लाभो.