मराठी राजभाषा दिन सोहळ्यात प्रा.प्रवीण दवणे यांचे प्रतिपादन

वसई, दि. 29(वार्ताहर) :माणसे आज केवळ वयाने वाढताहेत मात्र विकसित झालेली दिसत नाहीत. अतिसुखाचे दारिद्र्य सर्वत्र फोपवल्याने समाधानाने जगण्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. संघर्ष करण्याची उर्मी आणि वृत्ती संपवली जात आहे. यातून बाहेर पडण्यासाठी उत्सवी रंजनवादी नव्हे, तर वास्तवतेच्या अंजनवादी प्रबोधनाची आज समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध, तथा ज्येष्ठ गीतकार प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी ‘माझ्या लेखनाची आनंदयात्रा’ ह्या कार्यक्रमात बोलताना काढले.

कोकण मराठी साहित्य परिषदेची वसई शाखा आणि बॅसीन कॅथलिक को-ऑप बँक यांच्या संयुक्त विद्यमाने वसईच्या गणपतराव क्रीडा भवन सभागृहात ‘जागतिक मराठी राजभाषा दिन’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रा. दवणे यांनी विविध शाब्दिक अलंकार, उपहास आणि मार्मिक भाष्यातून केलेल्या शाब्दिक कोट्या, तसेच विनोदी ‘पंचेस’ना प्रेक्षकांनी टाळयांच्या गजरात उत्फूर्त प्रतिसाद दिला.

सुरुवातीलाच प्रा.दवणे यांनी वसईच्या निसर्गाबद्दल व येथील सर्वधर्म समभाव असलेल्या सहिष्णू समाजाची प्रसंशा केली.ते पुढे म्हणाले, ”वाचन, श्रवण, चिंतन-मनन, लेखन या सगळयांनी व्यक्तमत्त्व घडत जातं. मोठे साहित्यिक अनेक असतात, परंतु मोठा माणूस असलेले साहित्यिक फार क्वचित असतात. ड़ाव्या हाताने पुस्तक आणि उजव्या हाताने घास घेत, मी मोठा झालो. ब्युटी पार्लरचं सौंदर्य चार तास पण वाचनाचं डयुटी पार्लरचं सौंदर्य चोवीस तास असतं. अापली संध्याकाळ कुठे जाते? यावर आपली सकाळ अवलंबून असते. अाज मोबाईल वरील एका बोटाने क्लिक केलेल्या शुभेच्छा किंवा शोक संदेश, फुलांचे बुके हे काचेवरचं जीवन घसरत जातं, परंतु प्रत्यक्षातील काळजावरचं जीवन उजळत जातं. पूर्वी पाठयपुस्तक जीवन होतं, आता पाठीवरचं पुस्तक म्हणजे पाठयपुस्तक झालंय. आजची पिढी दुभंगलेली नाही तर माता, पिता व मुलं यांच्यात त्रिभंगलेली आह. संवेदनांची श्रीमंती काय आहे हे ज्याला कळते तोच खरा माणूस, सुखी माणूस कधी कलावंत होऊ शकत नाही. केवळ कानावर विसंबून न राहता कानाचा डोळा केला की जगण्याकडे कानाडोळा होत नाही, ” अशा अनेक प्रभावी वाक्यातून शब्दमोतींच्या माऱ्याने प्रा प्रवीण दवणे यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केल.

त्या अगोदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे बॅसीन कॅथलिक को-ऑप बँकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस आपल्या भाषणात म्हणाले, ”कोकण मराठी साहित्य परिषदेची वसई शाखा असे समाजहितैषी उपक्रम सतत घडवून आणते, त्याबद्दल कार्यकर्त्यांचे अभिनंदन करतो. तसेच बँकेच्या कार्यक्षेत्रांमध्ये होणाऱ्या समाजप्रबोधन, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांना कॅथलिक बँक सतत प्रोत्साहन देऊन आर्थिक मदत करते, कारण समाजासोबतच संस्थेचीही प्रगती होत असते.”

तद्नंतर गेली अनेक वर्षे वसईत शैक्षणिक आणि विधायक सामाजिक कार्य करीत असलेले कार्यक्रमाचे विशेष अतिथी बबनशेठ नाईक श्रोत्यांपुढे आपले विचार मांडताना म्हणाले,”एखादी व्यक्ती साहित्यिक, वक्ता , प्राध्यापक किंवा मार्गदर्शक म्हणून विविध भूमिका निभावून नेत असला तरी जो कोणतेही दडपण येऊ न देता सामान्य माणसात सहजरीत्या मिसळून जातो तोच खरा साहित्यिक असे मी मानतो. ज्येष्ठ साहित्यिक, कवी, तथा नाटककार वि.वा.शिरवाडकर हे मोठा माणूस आणि व्यक्ती होते, हे जास्त महत्वाचे ठरते.

कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रिय अध्यक्ष डॉ अशोक ठाकूर यांनी को.म.सा.प वसई करीत असलेल्या साहित्यिक कार्याबद्दल प्रसंशोद्गार काढले आणि श्रोत्यांमधील इयत्ता ५वी ते १०वी मधील विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्यांना प्रोत्साहनपर प्रबोधन केले. एप्रिल २०१९ ते मार्च २०२० या काळात विविध साहित्य प्रकारात प्रसिद्ध झालेली पुस्तके को.म.सा.प च्या साहित्य पुरस्कारासाठी पाठवण्याचे आवाहनही श्री ठाकूर यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाची सुरुवात पल्लवी राऊत-नेरकर यांच्या गायकवृंदाने गायिलेल्या प्रसिद्ध मराठी अभिमान गीताने झाली. क़ो.म.सा.प वसई शाखेचे कार्यवाह रेमंड मच्याडो यांनी सर्व मान्यवरांची ओळख व स्वागत केले.शाखेचे अध्यक्ष, तथा ज्येष्ठ पत्रकार अनिलराज रोकडे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये को.म.सा.प वसई शाखेने केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि पुढील कार्यक्रमाची रूपरेषा उध्दृत केली. अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या संदेशाचे वाचन शाखेचे कोषाध्यक्ष संदीप राऊत यांनी केले.

तद्नंतर वक्तृत्व स्पर्धेचे समन्वयक विजय पाटील यांच्या निवेदनानुसार पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रप्रदान करण्यात आली. क़ार्यक्रमाचे सुरेख निवेदन गोन्सालो गार्सिया कॉलेजच्या प्राध्यापिका रुबिना डिमेलो यांनी केले. शेवटी आभारप्रदर्शन वक्तृत्व स्पर्धेचे समन्वयक संतोष गायकवाड यांनी केले.

यावेळी विज्ञान लेखक जोजेफ तुस्कानो, सामाजिक कार्यकर्ते डॉ.विजय शिरीषकर, भाजपचे नेते दत्ता नर आणि शेखर धुरी, पत्रकार विजय खेतले, अंध:दुख निवारण मंडळाचे विलास चाफेकर, नगरसेवक संतोष वळवईकर, माजी नगरसेविका रोहिणी कोचरेकर, लेखक स्टॅन्ली गोन्सालवीस, ज्येष्ठ चित्रकार सुभाष गोंधळे, क्रीडा मंडळाचे विश्वस्त रतिश राऊत, पालघर कोमसापचे अध्यक्ष सुधाकर ठाकूर, ध्यास फाउंडेशनच्या अध्यक्षा कीर्ती शेंडे, मुख्याध्यापक माणिक दोतोंडे, प्रा. शत्रुघन फड, शिक्षिका सौ. कविता सावे, सुभाष विश्वासराव, सुरेश ठाकूर, प्रा. कृ. वि. उभाळकर आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *