
“सहकार्यातून समृद्ध” हे ब्रीदवाक्य उराशी बाळगून “समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट” ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आजच्या जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून दिनांक २३एप्रिल २०२४ मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता संगणक(कॉम्प्युटर) शिक्षक श्री.राजेश मोरे सर यांच्या कॉम्प्युटर लॅब मध्ये आणि त्यानी सुरू केलेल्या पुस्तक वाचनालयाला काही ललित साहित्य पुस्तके,बालसाहित्य मराठी – इंग्लिश भाषेतील पुस्तके भेट म्हणून पुस्तक वाचनाचा छंद जोपासणारे प्रा.सुभाष रा.जाधव सरांनी सप्रेमभेट म्हणून पुस्तके दिली. याप्रसंगी काही निवडक पुस्तकप्रेमी मित्र आणि विद्यार्थी उपस्थित होते. आजच्या तंत्रज्ञान युगात आणि हातात स्मार्टफोन उपलब्ध असताना कोण पुस्तके वाचतात का? असा प्रतिप्रश्न सहज मनात येऊ शकतो. तर आजच्या ज्ञान – तंत्रज्ञान युगात सुद्धा पुस्तकाचे महत्व अजूनही अधोरेखित होते. पुस्तक हे त्या लेखाला/ माहितीला विश्वसनीयता प्राप्त करून देते.निश्चितच काळाच्या ओघात नवनवीन तंत्रज्ञान येणार आहे.मात्र पुस्तक आणि वर्तमानपत्र वाचनाचा निर्भेळ आनंद सकाळ,संध्याकाळच्या वाफाळलेल्या चहाबरोबर घेण्यासारखा कुठेही नाही. चवीचवीने बातमी,माहिती घेतानाच आनंद फार वेगळा अनुभव असतो. असे मत पुस्तक प्रेमी श्री. राजेश मोरे यांनी व्यक्त केले. तर समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष श्री.सुभाष जाधव सरांनी पुस्तकां समवेत वाचन चळवळ सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढली पाहिजे. उत्तमोत्तम उत्तम मराठी साहित्य, वाड्मय हे मराठी वाचकांना मिळाले पाहिजेत. या करिता समृद्ध चॅरिटेबल ट्रस्ट वाचन संस्कृती जोपासण्यासाठी विविध स्तरावर सतत प्रयत्न करणार आहे. यासाठी आपल्या सारख्या चाहत्यांची आवश्यकता आहे. “गर्दी अल्प असली तरी चालेल मात्र ती व्यक्ती पुस्तकांकरिता दर्दी असावी.” असे मत प्रा.सुभाष जाधव सरांनी व्यक्त केले. पुस्तकांसाठी घर बनविणारे जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर होत. पन्नास हजारापेक्षा अधिक पुस्तकांचा वैविध्यपूर्ण संग्रह त्यांच्याकडे होता. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पुस्तकांची टिपण काढून त्याच्या नोंदी ते घेत असत. एवढे अगाध त्यांचे वाचन होते. याबाबतची माहिती दिनेश दाभोलकर सरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली.तर,पुस्तके ही माणसाला वैचारिक प्रगल्भ बनवितात आणि जीवनात येणाऱ्या अडचणी आणि कठीण प्रसंगाला सामोरे जाण्याचे ट्रेनिंग सुद्धा देतात.म्हणून उत्तम पुस्तक साहित्यासारखा दुसरा सखा नाही. असे त्यांनी आपल्या भाषणातून पुस्तक प्रेमी दिलेश लोंढे यांनी व्यक्त केले आहे. त्याच प्रमाणे इतर विद्यार्थ्यांनी आप आपली मते मांडली आणि कार्यक्रम संपन्न झाला.