
वसई (वार्ताहर) : मनमानी कारभार आणि शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पाठीशी घालण्यासाठी खुद्द सरपंचानेच पत्रकारांची मनधरणी करून समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकिस आले आहे.
ग्रामविकास अधिकारी पंकेश संखे यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांना आगाशी आणि बोईसर ग्रामपंचायतीतून निलंबीत करण्यात आले होते. असे असतानाही वरिष्ठांच्या आशिर्वादाने संखे पुन्हा आगाशी पंचायतीत रुजु झाले. त्यामुळे सोकावलेल्या संखे यांनी शासनाच्या आदेशाची पायमल्ली करत १९ नोव्हेंबरला सत्पाळा ग्रामपचायतीचा अजेंठा आणि अर्नाळा पंचायतीचे पंचवार्षिक विकास आराखडयाबाबत अत्यंत महत्वपुर्ण ग्रामसभेचे अजेंडे बेकायदेशीरपणे आणि अजेंडयाच्या नियमांना परस्पर छेद देत काढले.
तसेच आमचा गांव आमचा विकास या कार्यक्रमांतर्गत ग्रामविकास आराखडा तयार करण्यासाठी आयोजित करावयाच्या ग्रामसभेच्या विषय पत्रिकेत कुठले विषय घ्यावेत. याबाबत स्पष्ट सुचना असतानाही त्या संखे यांनी पाळल्या नाहीत.त्यामुळे या प्रकरणी संखे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जयप्रकाश ठाकुर यांनी केली होती. त्यावत सात दिवसांत खुलासा करण्याचे आदेश संखे यांना गटविकास अधिकारी उच्च श्रेणी यांनी दिले होते. या आदेशाला संखे यांनी केराची टोपली दाखवली होती.तशा प्रकारचे वृत्त प्रसिध्द झाल्यावर संखे यांना पाठीशी घालण्यासाठी संरपंच अनिल ठाकुर यांनी काही पत्रकारांची भेट घेवून अधिक वृत्त प्रसारीत न करण्याची विनंती करून समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याची खात्रीलायक वृत्त आहे.
दरम्यान,संखे यांच्या मनमानी कारभाराचा आणखी एक प्रकार उघडकिस आला आहे. संखे यांनी ग्रामपंचायतीचे प्रोसिडींग बुक बोकायदेशिररित्या कार्यालयाबाहेर नेले होते. ही बाब २६ जानेवारीच्या ग्रामसभेत उपस्थित राहण्यासाठी गेलेल्या जयप्रकाश ठाकुर यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी या प्रकाराची सरपंचांकडे लेखी तक्रार योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.