

2) हाँटेलचे बांधकाम करणाऱ्या भुमाफियांने नवीन इमारतीचे सरकारी जागेवर बांधकाम सुरू केले आहे.
बोईसर, वार्ताहर
पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत हद्दीत उभ्या राहिलेल्या सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी बेकायदेशीर पणे परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामाला संरक्षण मिळावे यासाठी आपल्या पदाचा दुरूपयोग ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे. यातच महसूल विभागाने देखील संबंधित बांधकामावर कारवाई करण्यासाठी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. यामुळे प्रशासनाच्या पाठींब्यांने मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे येथे उभी राहिली असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
सरावली संजय नगर येथील सर्वे नंबर 104/1 या सरकारी जागेवर अनधिकृत बांधकामे ग्रामपंचायतीच्या बेकायदेशीर परवानगीने सुरू आहेत. याठिकाणी अमरखान इसाकखान पठाण यांनी बेकायदेशीर बांधकाम करून पंचतारांकित हाँटेल बांधले आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी होऊन देखील महसूल विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नसल्याचे पाहावयास मिळत आहे. सरकारी जागेवर एकदोन लहान झोपड्या बांधून त्यानंतर काही वर्षातच त्याला घरपट्टी लावली जाते. त्यानंतर घर दुरूस्तीच्या नावाखाली सरकारी जागेवरच चक्क बांधकाम परवानगी दिली जाते. भुमाफियांनी सरावली भागातील सर्वच सरकारी मोक्याच्या जागेवर टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत सदस्य व त्यांच्या नातेवाईकांचे अनधिकृत बांधकाम असुन संजय नगर येथील बांधण्यात आलेले सरकारी जागेवरील हाँटेल हे ग्रामपंचायत सदस्य यांच्या भावाच्या नावे असल्याने ग्रामपंचायती कडुन देखील बांधकामाला अनेक सुविधा मिळत असल्याचा आरोप नागरीकांनी केला आहे.
संजय नगर येथे बांधकाम करण्यात आलेले शबरी हाँटेल ची जागा ही सरकारी असताना देखील सरावली ग्रामपंचायतीने 8 आँक्टोबर 2015 रोजी बांधकाम करण्यासाठी बेकायदेशीर पणे नाहरकत दाखल दिल्याचे समोर आले आहे. त्यातच बांधकाम झाल्यानंतर अनधिकृत इमारतीच्या बांधकामावर कारवाई बाबत अहवाल तहसीलदार पालघर यांच्या कडे सादर झाल्यानंतर सरावली सरपंच यांना हाताशी घेवुन सरकारी जागा असताना देखील सरपंच यांनी गावठानाची जागा असल्याचे पत्र 17 डिसेंबर 2017 रोजी देवुन अनधिकृत बांधकामाला संरक्षण देण्याचे काम करत आपल्या पदाचा दुरुपयोग केला असल्याचे दिसुन येते यामुळे सरकारी जागेवर बांधकाम करण्यासाठी ग्रामपंचायतीला हाताशी धरून केलेल्या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.
चौकट:
संजय नगर येथील दोन हेक्टर पेक्षा जास्त असलेल्या सरकारी जागेवर दोन एकर क्षेत्रावर गावठना साठी जागा राखीव आहे. परंतु शासनाने कोणत्याही प्रकारची गावठणाची हद्द निश्चित केली नसताना देखील ग्रामपंचायतीने बेकायदेशीर पण गावठाणचे दाखले खैरात वाटल्या सारखे बेकायदेशीर पणे दिले आहेत. यातच गावठणाचे कारण पुढे करत तहसीलदार महेश सागर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून बांधकामावर कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. याबाबत तहसीलदार यांना विचारणा केली असता त्यांनी गावठणाची हद्द लवकरच निश्चित करून बांधकामावर कारवाई केली जाईल असे लोकसत्ता सोबत बोलताना सांगितले. महत्त्वाचे म्हणजे गावठ क्षेत्र हे घराचे बांधकाम करण्यासाठी असुन याठिकाणी वाणिज्य बांधकाम करता येत नाही. परंतु असे असले तरी महसूल विभागच कायद्याच्या पळवाटा भुमाफियांना दाखवत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
⚫ सरकारी जागेवर बांधकाम केल्यानंतर महसूल व ग्रामपंचायतीचे संरक्षण मिळत असल्याची धारणा झाल्यामुळे येथील हाँटेल चे बांधकाम करणाऱ्या भुमाफियांने पुन्हा हाँटेलच्या बाजुला नवीन इमारतीचे बेकायदेशीर बांधकाम सुरू केले आहे.
संजय नगर येथील हाँटेल बांधकाम करण्यासाठी परवानगी देण्यात आली नव्हती. संबंधितांना घर दुरूस्ती साठी परवानगी देण्यात आली होती.
— सुभाष केणी, ग्रामविकास अधिकारी सरावली