

वसई-विरार महानगर पालिकेच्या वसईतील सर. डी. एम. पेटीट रुग्णालयातील दोन परिचारिकांना कोरोना
झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे हे रुग्णालय आता सील करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना पालिकेने वाऱ्यावर सोडल्याची माहिती आहे. त्यामुळे सुरुवातीपासून सामान्य जनतेचे लक्ष आरोग्य व्यवस्थेपेक्षा रेशनकड़े वळवणारे वसईचे आमदार आणि महापौर आता यावर पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडणार का? हा प्रश्न आहे.
वसईतील सर डी. एम. पेटीट रुग्णालयाचा भोंगळ कारभार सुरुवातीपासूनच उघड झाला होता. रुग्णालयाला होणारा संभाव्य धोका वसईतील एका सामाजिक कार्यकर्त्याने रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. भक्ती चौधरी यांच्या लक्षात आणून दिला होता. मात्र चौधरी यांचा confidence ‘सातव्या आसमान पर’ होता. त्यांनी त्या वेळी आपण सर्व काही काळजी घेत असल्याचे सांगितले होते.
पण पुढे त्या सामाजिक कार्यकर्त्यांने सांगितलेली भीती खरी ठरली. ही भीती वाढली ती नालासोपारा येथील रिद्धिसिद्धि रुग्णालयात कोरोनाचा पहिला बळी गेला तेव्हा. कारण हा रुग्ण आधीचे काही दिवस सर. डी. एम. पेटीट रुग्णालयात गेला होता. याबाबतची माहिती संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांने डॉ. भक्ती चौधरी यांना दिली होती. आणि त्यांनाही ही माहिती होती. त्यावेळी भक्ती चौधरी तहसील कार्यालयात बैठकीत होत्या. याच वेळी या सामाजिक कार्यकर्त्यांने रुग्णालयात आवश्यक ती साधने आणि काळजी घेतली जात नसल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले होते.
शिवाय त्या रुग्णाला सेवा पुरवलेल्या वॉर्डबॉय यांनी त्यावेळी मास्क व ग्लोज आणि इतर कीट वापरले नसल्याचेही सांगितले होते. या ठिकाणी एचआयव्ही कीट वापरले जात असून; तेही फाटले असल्याचे त्यांच्या लक्षात आणून दिले होते. पण त्या वेळी डॉ. भक्ती चौधरी यांनी आपण आणि आपला स्टाफ योग्य ती काळजी घेत असून; आपण एचआयव्ही कीट का वापरत आहोत; यावर शास्रीय कारणे दिली होती.
पण अवघ्या दोन दिवसांत संबंधित वॉर्डबॉयना विलगीकरण कक्षात नेल्याची खबर आली. त्या वेळी ही या समजसेवकाने ही माहिती खरी आहे का? हे विचारण्यासाठी त्यांना फोन केला असता; त्यांनी खबरदारी म्हणून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवले असल्याचे सांगितले. शिवाय त्यांना 100 टक्के कोरोना होणार नाही, असे छातीठोक सांगितले. पण आता वॉर्डबॉयच्या नाही; पण नर्सच्या निमित्ताने या रुग्णालयाचा कारभार चव्हाटयावर आलाच आहे.
या काळात कित्येक रुग्ण आणि प्रसूतीसाठी गरोदर महिला या रुग्णालयात येऊन गेल्या आहेत. साहजिकच त्यांची काळजी वाढली आहे. आज खबरदारी म्हणून सर. डी. एम. पेटीट रुग्णालयात सील करण्यात आले असले तरी.…त्यातून निर्माण झालेला धोका कायम आहे.
हे प्रकरण आपल्यावर शेकू नये म्हणून रुग्णालय प्रशासनाकडून त्या नर्सना विलगीकरण कक्षात कोरोनाचा संसर्ग झाला असेल; याकड़े सगळ्यांचे लक्ष वेधले जातेय. अशात आता रुग्णालयात प्रशासनाने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची माहिती आहे.
कारण महापालिका स्वराज्य संस्था म्हणून आरोग्य सुविधा देण्यात नेहमीच निष्क्रिय ठरली आहे. आणि तिचे पालकत्व असलेला बहुजन विकास आघाडी हा पक्ष सामान्य जनतेचे भलत्याच विषयांकड़े लक्ष वेधत आहे.
…..
डॉ. तब्बसूम काझी यांच्यावर दबाव?
सर डी. एम. पेटीट रुग्णालयातून एक धक्कादायक माहिती बाहेर आली आहे. हे रुग्णालय सील करण्यात आल्यानंतर येथील तब्बल 160 जणांची विलगीकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. वैभव हॉटेल, सरकारी रुग्णालय आणि अगरवाल रुग्णालय अशा तीन ठिकाणी या सगळ्यांना ठेवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे यातील केवळ 40 जणांचे नमुने घेण्यात आले आहेत. इतर कर्मचाऱ्यांची चाचणी करण्यास त्यांनी नकार दिला आहे.
इतर लोक संसर्गजन्य नसतील, असे खुद्द महापालिका रुग्णालयांच्या प्रमुख असलेल्या डॉ. तब्बसूम काझी यांनी तर्क लावला असल्याचे विलगीकरण कक्षात असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे. आपल्यावर दबाव असल्याने रुग्णालय बंद ठेवू नये, असेही त्या म्हणत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
पण आपल्या चाचणी झाल्याशिवाय आपण कामावर जाणार नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. डॉ. तब्बसूम काझी यांच्या अशा वर्तनामुळे घेतलेल्या नमुनेही चाचणीसाठी पाठवले जातील की नाही, याबाबत साशंकता या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
पापड़ीतील रुग्ण दगावल्यानंतर मिळाले N95 मास्क
पापडीतील दगावलेला 28 वर्षीय रुग्ण कोरोना पोझिव्ह होता; हे निष्पन्न झाल्यानंतर सर डी. एम. पेटीट रुग्णालयात N95 मास्क देण्यात आले आहेत. त्याअगोदर हे कर्मचारी साधे मास्क घालूनच काम करत असल्याचे या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावरून वसई-विरार महापालिकेने कोरोनासारख्या संकटातही आरोग्य व्यवस्थेचे कसे धिंडवड़े काढले आहेत, हे स्पष्ट झाले आहे.