
बोईसर, वार्ताहर दि.02
बोईसर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ग्रामीण भागा बरोबरच शहराचे जनजीवन विस्कळीत झाले असुन पाचव्या दिवशी देखील पावसाचा जोर कायम राहिला. मंगळवारी सकाळी पाऊस थोडावेळ थांबल्याने नागरीकांना थोडा दिलासा मिळणार तेवढ्याच दुपार पासुन मुसळधार पावसाला सुरूवात झाली. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम होऊन सोमवार प्रमाणेच मंगळवारी सुध्दा सकाळच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्याने मुंबई कडे जाणाऱ्या प्रवाशांना माघारी परतावे लागले.
मुख्य रस्त्यावर सोमवारी रात्री अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहन चालवणे जिकरीचे झाले होते. नैसर्गिक नाल्यांंवर बांधकाम झाल्याने अरूंद नाल्यातुन पाणी जात नसल्याने पुर स्थिती बोईसरच्या काही भागात निर्माण झाली होती. बोईसर पालघर मुख्य रस्त्यावर सरावली ग्रामपंचायती जवळ पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी गटार नसल्याने या भागात तलावाचे स्वरूप आले होते. परिणामी रात्रीच्या वेळी लहान वाहने या ठिकाणांहून जात नव्हती. शहराकडे वाटचाल करत असलेल्या बोईसर भागात नियोजनाचा अभाव असल्याने बेकायदेशीर उभ्या राहिलेल्या बांधकामामुळे अनेक भागात नागरीकांना साचलेल्या पाण्यामुळे त्रास सहन करावा लागला.
कोणत्याही भागात घडल्या घटना
बेटेगाव पोलीस चौकीसमोरील बोईसर – चिल्हार रस्ता पहाटे चार वाजता पाण्याखाली जाऊन रस्त्याच्या वरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहत होते. याठिकाणी असलेल्या पोलीस चौकीत चार फुटापर्यंत पाणी शिरले होते. येथील पेट्रोल पंपावर पार्कींग करण्यात आलेली मारुती 800 कार पाण्यात वाहत येवुन गटारात पडली होती.
नीहे गावात पावसामुळे घर कोसळले
पावसामुळे नीहे गावातील गिता गणेश पाटील यांच्या राहत्या घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. घर धोकादायक झाल्याने या कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून या घराच्या पडझडीमुळे उर्वरित भिंती कोसळून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.नैसर्गिक आपत्तीमुळे गीता पाटील यांचे लाखांचे नुकसान झाले असून हे कुटुंब बेघर झाले आहेत.
नागझरी गाव 4 दिवसांपासून अंधारात
विद्युत जनित्र जळाल्याने गेल्या चार दिवसांपासून नागझरी गाव अंधारात आहे. पावसाची संततधार सुरू असल्यामुळे विद्युत जनित्र बसविण्यास अडचण निर्माण होत असल्याचे संबधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
