


जीवन मोरे यांचे पुढाकाराने १००जणांना भोजन!
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या सहकार्याने सांगली जिल्ह्यातील दिघंची येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन मोरे यांनी लॉकडाऊन काळात दिघंची परिसरात मुलाबाळांसह अडकलेल्या सुमारे शंभर लोकांना अन्नदान केले.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या राज्य अध्यक्ष शितलताई करदेकर यांच्या निर्देशानुसार व जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके यांच्या मार्गदर्शनानुसार दिघंची येथील सामाजिक कार्यकर्ते जीवन मोरे यांनी युनियनचे आटपाडी तालुकाध्यक्ष नंदकुमार विभुते, प्रसिद्धीप्रमुख बापूसाहेब नामदास, सचिव अक्षय बनसोडे, अमोल काटे, कांतीलाल कारळे यांच्या सहकार्याने विविध ठिकाणी अन्नदान केले.
बापूसाहेब नामदास व जीवन मोरे यांनी दिघंची परिसरात मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथील आयुर्वेदिक औषध विकणारी काही कुटुंबे,उत्तरप्रदेशमधील कानपूर येथील आईस्क्रीम विकणारी काही कुटुंबे व नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यातील काही कुटुंबे लॉकडाऊन काळात अडकून पडलेली आहेत. त्यांना उपजीविकेचा कोणताही स्रोत नाही. अन्नपाण्याच्या कमतरतेमुळे लहान मुलांसह त्यांची उपासमार होत आहे,अशी माहिती मिळाली.
नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या सहयोगाने जीवन मोरे यांनी या सर्वांना अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवार दिनांक 9 रोजी स्वच्छ व ताजे अन्न तयार करून दिघंची येथील पश्चिमेकडील मंगल कार्यालयात अडकलेल्या मिरज तालुक्यातील सुभाषनगर येथील आयुर्वेदिक औषध विक्री करणाऱ्या 10 औषध विक्रेत्यांना, दिघंची हायस्कूलच्या पाठीमागे राहणाऱ्या 20 आईस्क्रीम विक्रेत्यांना व साळसिंगमळा येथील मंगल कार्यालयात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर व पेठ तालुक्यातील दिघंची येथे कोल्ड स्टोरेजमध्ये पॅकिंगचे काम करणाऱ्या सुमारे 70 कामगारांना अन्नदान केले.
यावेळी खानापूरचे युवा नेते विशाल पाटील, युनियनचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मणराव खटके, तालुकाध्यक्ष नंदकुमार विभुते, सचिव अक्षय बनसोडे, प्रसिद्धीप्रमुख बापूसाहेब नामदास, अमोल काटे, कांतीलाल कारळे, उपस्थित होते. या कामी संकेत मोरे, प्रशांत करंडे, चैतन्य जाधव यांनी सहकार्य केले.