
बनावट सही करून 2 लाख 50 हजारांचा अपहार ?
सातपाटी ग्रामपंचायतीच्या कपाटातील कोरे चेक चोरून त्यावर सरपंच,ग्रामसेवक ह्यांच्या बनावट सह्याद्वारे 2लाख 50 हजार रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या ग्रामपंचायतीचे पाणीपुरवठा सभापती कांचन प्रकाश पाटील ह्याला सातपाटी सागरी पोलिसांनी बुधवारी अटक केली.
बेरर चेक द्वारे विविध भागांतील बँकेच्या शाखातून पैसे लाटण्याच्या ह्या प्रकरणात अन्य साथीदारांच्या सहभाग आहे का? ह्याचा पोलीस शोध घेत आहेत.सातपाटी ग्रामपंचायतीचे ठाणे जिल्हा मध्यवर्ती शाखेत खाते असून ते सरपंच अरविंद पाटील आणि ग्रामसेवक रवींद्र खेडकर ह्यांच्या नावाने असून त्यांच्या जवळ 2-3 चेकबुक होते.ग्रामपंचायत कार्यालयातील तिजोरीत ठेवलेल्या चेकबुक मधील एक 20 पाणी चेकबुक गहाळ झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ग्रामसेवक रवींद्र खेडकर ह्यांनी 11 डिसेंबर 2021 रोजी सातपाटी सागरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सातपाटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मयुरेश अंबाजी ह्यांनी ह्या प्रकरणाचा बारकाईने अभ्यास केला असता ठाणे जिल्हा बँकेच्या पालघर,बोईसर,विरार ह्या शाखेतून वेगवेगळ्या नावाने आरोपी कांचन पाटील ह्यानेच सरपंच आणि ग्रामसेवक ह्यांच्या बनावट सह्या करून 2लाख 50 हजाराची रक्कम काढल्याचे पुरावे हाती लागले.आरोपीच्या मोबाईलचे लोकेशन ही बँकेजवळ दाखवीत असल्याने भक्कम पुरावे हाती आल्या नंतर पोलिसांनी त्याच्या सातपाटीतील घरातुन उचलले.त्याच्याविरोधात भादवी कलम 420,सह अन्य पाच कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस ह्या प्रकरणात अन्य आरोपीचा सहभाग असल्याबाबत चौकशी करीत असून आरोपी जवळ 20 पाणी चेकबुक असल्याने त्याचा दुरुपयोग झाला आहे का?ह्याबाबत तपास करीत आहेत.शुक्रवारी त्याला पालघर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याचे उपनिरीक्षक अंबाजी ह्यांनी सांगितले.