सातपाटी प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार घेतलेल्या एका रुग्णाला उपचार केल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. रुग्णाने पैशाची पूर्तता केली नाही म्हणून रागाने आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. किशोर गुलाले यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून रुग्ण समोरच फाडल्याने घडलेल्या प्रकारानंतर सातपाटी येथील रुग्ण निमेत आरेकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार देऊन संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर शासकीय सेवेचा भंग केल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.खुलासा समाधानकारक नसल्यास लवकरच त्यांची बदली इतर तालुक्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.

निमेत याचा 1 जानेवारी रोजी दुचाकीच्या अपघातात पायाला जखम झाली होती. या अपघातावर त्यांनी सातपाटीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतले. तिथे उपस्थित असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार करून त्याला आठवडाभराच्या औषधोपचार दिला व घरी आराम करण्याचा सल्ला दिला. यादरम्यान तो कामावर जात असलेल्या ठिकाणी कामावर जाऊ शकला नाही त्यानंतर निर्मात्याला कामावर जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र देणे आवश्यक होते त्यानंतरच त्याला कामावर घेतले जाणार होते. यासाठी त्याने रविवारी आरोग्य केंद्रात जाऊन आरोग्य अधिकारी डॉ. किशोर गूलाले यांच्याकडून वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली या प्रमाणपत्राची मागणी केल्यानंतर डॉ. गूलाले यांनी प्रमाणपत्र तयार करून पैशांची मागणी केली.पैशाची मागणी केल्यानंतर निमेत यांनी त्यांच्या काकांना फोनवरून संपर्क साधला आणि गुलाले यांच्याशी बोलण्याची विनंती केली. त्यावेळी काकांनी शासकीय शुल्क किती आहे ते सांगा म्हणजे तो तेवढी रक्कम भरेल असे सांगितले. या गोष्टीचा राग धरून संबंधित गुलाले यांनी तयार केलेले प्रमाणपत्र फाडून टाकले आणि अशी प्रमाणपत्रे द्यायला आम्ही बांधील नाहीत असे बेजबाबदार वक्तव्य केले होते. त्यामुळे डॉ.गुलाले यांनी बेजबाबदारपणामुळे व चुकीच्या पद्धतीने वागणूक दिल्यामुळे त्यांच्या विरोधात निमेत आरेकर यांनी विविध ठिकाणी तक्रार दाखल केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने डॉ. गुलाले यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे व या प्रकरणात खुलासा (कारणे दाखवा) मागविण्यात आला आहे. हा खुलासा समाधानकारक नसल्यास त्यांची बदली इतरत्र केली जाणार असल्याची पुष्टी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.

चौकट :
याआधी डॉक्टर किशोर गूलाले हे सफाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कार्यरत होते. तेथेही ते अनेक वादग्रस्त प्रकरणामुळे चर्चेत होते. तसेच त्यांच्या कार्यपद्धती विरोधात राजकीय पक्षांनी आंदोलनेही केली होती. त्यांच्या विरोधात तक्रारी आरोग्य विभागात दाखल केल्यानंतर त्यांची बदली सातपाटी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *