
पालघर,प्रतिनिधी,
आशियातल्या सर्वात मोठ्या तारापूर औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांनी प्रक्रिया न करता थेट सांडपाणी खाडीमध्ये सोडू नये अशी तंबी व 200 कोटींपेक्षा अधिक रुपयाचा दंड हरित लवादाने येथील कारखानदारांना ठोठावला असतानाही मुरबे खाडीमध्ये राजरोसपणे रंगीत रासायनिक प्रदूषित सांडपाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याचे समोर आले आहे. या सांडपाण्यामुळे समुद्र जीव संपत्तीला मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याकडे पुन्हा एकदा लक्ष देणे आवश्यक बनले आहे. या प्रकारामुळे समुद्रकिनारा पट्टीतील मच्छिमारांनी मध्ये असंतोष पसरला आहे.
हजारो कारखान्यांमधून निघणारा रासायनिक प्रदूषित सांडपाणी यावर प्रक्रिया करूनच ते पुढे सोडणे आवश्यक आहे. मात्र वारंवार हे कारखाने हे सांडपाणी प्रक्रिया न करता थेट समुद्रात सोडून देत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ यावर देखरेख करणारी संस्था असली तरी त्यांचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. अलीकडेच यासाठी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. पर्यावरणीय सुरक्षेचे महत्त्व लक्षात घेत हरित लवादाने प्रदूषणकारी कारखान्यांना कोट्यावधीचा दंड ठोठावला होता. याचबरोबरीने या प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी समिती तयार करावी व त्या समिती ने प्रदूषणावर तोडगा काढावा असे म्हटले होते असे असतानाही गेल्या काही दिवसांपासून मुरबे खाडी रासायनिक सांडपाण्यामुळे रंगीत होऊ लागली आहे. यामुळे खाडीतील पाणी काळ्या रंगाचे झाले असून या पाण्याला दुर्गंधी येत आहे.हे येथील मच्छीमारांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रदूषणाचा प्रकार समोर आला आहे.अनेक वेळा हरित लवादाने कारखान्यांना तंबी दिल्यानंतर हा प्रकार सुरू असेल तर प्रदूषण नियंत्रण मंडळ काय करते असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या कारखान्यांमुळे व त्यांच्या प्रदूषणामुळे मोठा पर्यावरणीय परिणाम जाणवून येत आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झाले असतानाही पुन्हा एकदा खाडी प्रदूषण सुरु असल्याचे समोर आले.
गेल्या दोन दिवसांपासून मुरबे खाडी रंगीत पाण्याने भरून गेली असून या पाण्यामुळे खाडीतील मासे मृत पावल्याचे सांगण्यातयेत आहे. खाडी चा प्रवाह असल्याने हे मासे तिच्यासोबत वाहून गेले त्यामुळे ते निदर्शनास आले नसले तरी मच्छिमारांनी खाडीतील पाण्याचा केलेल्या चित्रीकरणवरून प्रदूषण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. हरित लवादाने कारखानदारांना फटकारल्यानंतर ही त्यांच्या मानसिकतेत बदल झाल्याचे दिसून येत नाही याचा मोठा फटका औद्योगिक वसाहतीच्या आजूबाजूच्या परिसरातील गावांना व खाडी, समुद्रासह यावर मत्स्यव्यवसाय अवलंबून असलेल्या मच्छीमारांवर बसला आहे वारंवार सुरू असलेल्या प्रदूषणामुळे मच्छिमारांनी संताप व्यक्त केला आहे. ताबडतोब खाडीत होणारे थेट प्रदूषण बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
सरसकट प्रदूषित रसायने मुरबे खाडी सोडून खाडीतली जैवविविधता नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत याला तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कंपन्या जबाबदार आहेत. असे प्रदूषित अतिक्रमण थांबले नाही तर या प्रशासनाला जागरूक करण्याचे काम आम्ही करणार आहोत. उद्रेक झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार असतील.
- विनोद पाटील, जिल्हाध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती