वसई,(प्रतिनिधि) वसईतील सामवेदी ख्रिस्ती कुपारी संस्कृती मंडळातर्फे आठवा कुपारी संस्कृती महोत्सव गुरूवारी नंदाखाल येथील स्व.फा.बर्नड भंडारी संकूलात संपन्न झाला.या महोत्सवानिमीत्त भव्य संस्कृती दिंडी काढण्यात आली होती.विस हजार सामवेदी ख्रिस्ती कुपारी समाजबांधवांनी या वेळी हजेरी लावली.
कुपारी महोत्सवाची संस्कृती दिंडी संध्याकाळी 5 वाजता विरार पश्चिम येथील अब्राहम नाका येथून सुरू झाली होती. हि दिंड नंदाखाल येथील स्व.फा.बर्नड भंडारी संकूलापर्यंत पोहचली. या महोत्सवाचे अध्यक्ष रेव्ह.फा.जॉन्सन मिनेझिस होते.प्रमुख अतिथी म्हणून सिस्टर मीना डायस तसेच विशेष मान्यवर रेव्ह. फा.रॉबर्ट डिसोझा ,फा.थॉमस डिसोझा, कॅथॉलिक बॅकेचे अध्यक्ष रायन फर्नांडिस ,मॅन्युअल लोपीस,फादर सालोमन राॅड्रीग्ज,कुपारी मंडळाचे अध्यक्ष
जिम राॅड्रीक्ज आदि मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी समाजाच्या पाशीहार अंकाचे प्रकाशन,कुपारी दिनदर्शिका प्रकाशन करण्यात आले.समाजातील राॅबीन लोपीस,सॅबी परेरा व कु.स्टेसी परेरा या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी धम्माल कुपारी डान्स,कुपारी गीतसंगीत,कुपारी बॅंड,बहारदार सांस्कृतिक व लहान मुलांसाठी बालजत्रा,कुपारी फूड फेस्टिव्हल व लकी ड्रॉ लॉटरी बक्षिसांची लयलूट करण्यात आली.
  कुपारी संस्कृती महोत्सवासाठी हायटेक तरूणाई गेल्या महिनाभर आधीपासून वेगवेगळया समित्याव्दारे मेहनत घेत होती.सामवेदी बोलीभाषा आणि संस्कृती टिकून रहावी म्हणून  आठ वर्षापूर्वी समाजातील उच्च शिक्षित तरूणांनी एकत्र येऊन याची सुरूवात केली. मुळात शेती, बागायती आणि दुभदुभत्याचा व्यवसाय करणारा हा शेतकरी समाज. सामवेदामुळे संगीत हा या समाजाचा स्थायीभाव.पूर्वी रहाटाच्या पाण्याने शेती बागायतीचं शिंंपण व्हायचं, दांडातून पाणी जायचं त्यावर, किंवा नवरदेवाला सजविण्याची वेळ असू द्या. सर्वत्र सामवेदी संस्कृती आणि त्याच कृृृृषी संस्कृतीतून आलेली प्रतिकं दृष्टिस पडायची. धोत़र, सदरा, काळं जॅकेट आणि त्यावर लाल टोपी हा पुरूषांचा पेहराव तर लाल लुगडं आणि पोवळयांचा दाागिना हा स्त्रियांचा साजश्रृंगार. कोकणीच्या जवळ जाणारी मराठी भाषेची बोलीभाषा असलेली सामवेदी बोली अशी हया समाजाची ओळख होती. तोच समाज मागील पन्नास वर्षात प्रचंड नागरीकरण व आधुनिकीकरणामुळे आमूलाग्र बदलून गेला.आपल्या जन्मजात भाषेची आता लाज वाटू लागली. मात्र, त्याविरोधात काही वर्षांंपासून  जनजागरण होत असून पुन्हा मुळाकडे जाण्याचा प्रयत्न हा समाज करीत आहे.
    आमच्या बोलीभाषेचा आम्हाला अभिमान आहे. आमची संस्कृती मोलाची आहे म्हणूनच संस्कृतीचा गौरव करण्यासाठी तरूण पुन्हा एकत्र आले आणि त्या निमित्ताने जो महोत्सव साजरा होत असतो त्याला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असतो. संस्कृती दिंडीने कुपारी महोत्सवाची सुरूवात झाली. पारंपारिक वेषात संपूर्ण समाज एकत्र आला होता. दिंंडीच्या मध्यभागी बैलगाडी चालवण्यात आली . हा एका अर्थाने तो कृतज्ञता सोहळाच असल्याचे आयोजकांनी सांगितले . कारण बैलाच्या श्रमावरच समाजाचं भरणपोषण झालेलं आहे. महोत्सवात सांस्कृतिक चित्रे व वस्तूंची प्रदर्शनं आयोजित केली जातात.सामवेदी ख्रिस्ती संस्कृतीचे मनोहारी चित्र या महोत्सवात आपल्याला पहायला मिळते. खाद्यजत्रा हे तर महोत्सवाचं विशेष आकर्षण होते. सामवेदी समाजाचे अनेक वैशिष्टयपूर्ण खादयपदार्थ येथे पाहायला मिळाले.सोहळयाचे अजून एक वैशिष्टय म्हणजे प्रत्येक वर्षी समाजातील गुणवतांचा येथे सन्मान करण्यात आला. नाताळानंतरची दुस-या दिवशीची संध्याकाळ संपूर्ण समाज एकत्र आला आणि आपली भाषा व संस्कृतीचा गौरव केला. हा जरी एका समाजाचा उत्सव असला तरीही पाहुण्यांना येथे मुक्तव्दार असते. या, पहा, अनुभव घ्या आणि येथून प्रेरणा घ्या हीच आयोजकांची भूमिका असते. संपूर्ण तरूणाई महिनाभर आधीपासून वेगवेगळया समित्यांव्दारे कामाला लागलेली असते. कुपारी संस्कृती महोत्सव म्हणजे एक आनंदसोहळा असतो.
हा महोत्सव सुरू होऊन संपेपर्यंत प्रत्येकजण एक दुस-यांनी आपल्या मूळ बोलीभाषेतूनच संवाद साधत होता.बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम,संस्कृती प्रदर्शन दालन,कृपारी फूड फेस्टीवल,पाशीहार या महोत्सव अंकाचे प्रकाशन आदि कार्यक्रम या महोत्सवात संपन्न झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *