
विरार | दि. २० जुलै २०२५ – नालासोपारा विधानसभेचे आमदार मा. राजनजी नाईक (आप्पा) यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक विस्ताराला नवी चालना मिळत असून, वसई-विरार व नालासोपारा परिसरात पक्षात सामील होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
याच पार्श्वभूमीवर रविवार, दिनांक २० जुलै २०२५ रोजी कणेर, विरार येथे सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती सायलीताई संजय जाधव यांनी आपल्या ३५० समर्थक कार्यकर्त्यांसह भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला. आमदार श्री. राजनजी नाईक (आप्पा) यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या प्रवेश सोहळ्यामुळे भाजपच्या स्थानिक पातळीवरील बळकटीकरणाला नवी दिशा मिळाली आहे.
या कार्यक्रमास भाजपचे अनेक प्रमुख नेते व पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये जिल्हा अध्यक्षा प्रज्ञाताई पाटील, माजी जिल्हाध्यक्ष श्री. महेंद्र पाटील, माजी कोषाध्यक्ष हरेंद्रदादा, माजी जिल्हा उपाध्यक्ष डी. एन. खरे, माजी मंडळ अध्यक्ष नारायण मांजरेकर, सध्याचे मंडळ अध्यक्ष वैभव झगडे, मंडळ सरचिटणीस सागर विचारे व सुनीता पाटील, तसेच मंडळ कोषाध्यक्ष वासुदेव मेस्त्री यांचा समावेश होता.
कार्यक्रमात बोलताना आमदार राजनजी नाईक (आप्पा) यांनी सायलीताई जाधव यांच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली व भाजपच्या विचारसरणीशी प्रेरित होऊन त्यांचा पक्षात प्रवेश होणं ही पक्षासाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगितले.
सायलीताई जाधव यांनी देखील आपल्या भाषणात भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास असल्याचे सांगत आगामी काळात पक्षाची निष्ठेने सेवा करण्याचे आश्वासन दिले.
