
नालासोपारा :- वाहनांच्या नंबरप्लेटसह वाहनावर दादा, मामा, पोलीस असे लिहिल्यास मोटर वाहन कायद्यानुसार अशा वाहनधारकांवर पोलीस दंडात्मक कारवाई करीत असतात. अनेक जण वाहनावर नंबर टाकतानाच दादा, नाना, काका या नावांसह पोलीस, पत्रकार, व्हीआयपी असेदेखील लिहितात. मात्र, शासनाने निर्देशित केलेल्या नंबरशिवाय वाहनावर काहीही लिहिणे हा अपराध आहे. तरीदेखील सर्रास अशी वाहने आपल्याला सर्वत्र फिरताना दिसतात. वाहतूक पोलिसांकडून अशा वाहनांवर सध्या कारवाई करण्यात येत आहे.
नंबर प्लेटवर काहीही लिहिणे दंडनीय
शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाहनावर नंबर टाकणे गरजेचे आहे. काही लोक स्पेशल नंबर घेऊन दादा, मामा, काका असे नंबर टाकताना लिहितात. यासह नंबर प्लेटवर नंबर न टाकता पोलीस, पत्रकार अथवा पक्षाचे चिन्ह टाकतात. हे नंबर प्लेटवर दंडनीय आहे.
पहिल्यावेळी ५०० नंतर दीड हजाराचा दंड
अशा वाहनांवर वाहतूक पोलीस कारवाई करीत असून, पहिल्यांदा पकडल्यावर ५०० आणि दुसऱ्यांदा त्याच वाहनाला पकडले तर १५०० रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
सहा महिन्यांत ६४२ जणांवर कारवाई
काशिमिरा वाहतूक पोलिसांनी १०५७ वाहनांवर कारवाई करून ५ लाख ६२ हजारांचा दंड केला आहे. तर वसईत ८४ वाहनांवर ४२ हजाराचा दंड आणि विरार पोलिसानी ४०१ वाहन चालकांना २ लाख ८ हजार ५०० रुपयांचा दंड केला आहे. मागील सहा महिन्यात वाहतूक विभागाने ६४२ वाहनांवर कारवाई करून ८ लाख १२ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध
मोटार वाहन कायदा-१९८८ आणि मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध आहेत. तरीही शहरात असंख्य वाहनचालकांची भाईगिरी सुरू आहे. गुन्हेगारी कारवायांमध्ये वापरण्यात येणाऱ्या वाहनांची ओळख पटू नये म्हणून फॅन्सी नंबर प्लेट लावल्या जातात. स्वतः आणि गाडीची ओळख लपवण्यासाठी गाडीच्या क्रमांकाला आई, भाईचा आकार देणाऱ्या वाहनचालकांचा सुळसुळाट वाढत असतो.
कोट
प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे नियमानुसार देणेत आलेल्या ठराविक नमुन्याप्रमाणेच वाहनांवर नंबर प्लेट असणे अपेक्षित आहे.एखादा अपघात झाला किंवा अपघातसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, चैन स्नाचिंग सारखे अपराध करून आरोपी पळून जाऊ लागले तर नागरिकांना नमूद वाहनाचा नंबर नीट टिपता नाही,म्हणून नंबर प्लेट संबंधी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. – कैलास चव्हाण, (सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतूक विभाग)