नालासोपारा :- गेल्या 20 महिन्यापासून कोरोना विषाणूने देशाला वेठीस धरलं आहे. दरम्यानच्या काळातील दोन-तीन महिने वगळता मागील दीड वर्षापासून देशात सातत्याने लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. संपूर्ण देशाला कोरोना विषाणूने ग्रासलं आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. तर काहींचे व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिक कर्जबाजारी झाले आहे. एकीकडे संपूर्ण देश कोरोनाच्या लढ्यात व्यग्र असताना, देशात लाचखोरी आणि काळाबाजारीच्या घटनांना उत आला आहे. एकीकडे पोलीस आणि डॉक्टर आघाडीचे कोरोना योद्धे म्हणून आपली सेवा बजावत असताना, यातीलचं काहीजणांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार केला आहे.

सध्या सुरू असलेल्या तिसऱ्या कोरोनाच्या लाटेमूळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. लॉक डाऊनच्या काळात व्यवसायिकांचे सुद्धा हाल होत आहे. अशाही काळात सरकारी कर्मचारी मात्र लाच घेतल्याशिवाय किंवा मागितल्याशिवाय काम करत नाही. मागील दोन वर्षांपासून कोरोनाची लाट सुरू असताना मात्र वसई तालुक्यात लाचखोरी सुरूच आहे. वसई विरार महानगरपालिकेचे अतिक्रमण विभाग आणि प्रभागातील लिपिक आघाडीवर असल्याची माहिती उघडकीस आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2020 व 2021 यादरम्यान वसई तालुक्यात ठाणे व पालघर लाचलुचपत विभागाने 16 सापळे रचून 24 लाचखोरांना अटक केली आहे.

कोरोनाकाळात वसई विरार मनपा सर्वात पुढे…….

1) 2020 साली :- 2 लिपिक मनपा, 1 महावितरण, 1 ग्रामसेवक, 2 वनविभाग

2) 2021 साली :- 1 लिपिक आणि 1 कनिष्ठ अभियंता , 1 लिपिक नगररचना विभाग, 1 सेवानिवृत्त ग्रंथपाल, महानगरपालिका, 1 पोलीस उपनिरीक्षक, 2 पोलीस कर्मचारी, 2 मुख्याध्यापक, 1 अंगणवाडी सेविका, 1 राज्य कर अधिकारी, 2 वैद्यकीय विभाग, 1 तलाठी, 1 मंडळ अधिकारी, 1 सेक्शन इंजिनिअर, 2 खाजगी इसम

गतवर्षीपेक्षा लाचखोरी वाढली……….

लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी 2020 पेक्षा 2021 मध्ये जास्त लाचखोरांना अटक केली असून गतवर्षीपेक्षा यावर्षात लाचखोरी वाढली. सन 2020 मध्ये 4 केसेस करून 6 लाचखोरांना अटक केली तर सन 2021 मध्ये 12 केसेस करत 18 लाचखोरांना अटक केली आहे.

तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी मागितली लाच……..

मौजे ससूनवघर येथील जमिनीचे बिनशेती व कर रूपांतर करणे बाबत आदेशाचे सात बारा, फेरफार नोंद करण्याकरिता तलाठी विलास करे पाटील, मंडळ अधिकारी शशिकांत पडवळे आणि खाजगी इसम प्रवीण माळी या तिघांनी 1 लाख 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. ठाण्याच्या लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी तडजोडीअंती ठरलेली 70 हजारांची रोख रक्कम घेताना रंगेहात पकडले होते. या कारवाई नंतर तहसील व महसूल प्रशासनात एकच खळबळ माजली होती.

या नंबरवर बिनधास्तपणे करा तक्रार……..

भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याशी संपर्क साधा. ई मेल dypacbpalghar@gmail.com, टोल फ्री नंबर – 1064, दूरध्वनी क्रमांक – 02525 – 297297 आणि व्हॉट्सअप क्रमांक – 9923346810, 8007290944

1) सरकारी कर्मचाऱ्याने कोणत्याही कामासाठी लाच घेऊ किंवा मागू नये. लाचेची कोणी मागणी करत असेल तर पालघरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. त्याची पडताळणी करूनच संबंधित सरकारी कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल. दरवर्षी याकरिता विभागाकडून जनजागृती करण्यात येते. घोटाळा, भ्रष्टाचार होत असल्यास जागरूक नागरिकांनी तक्रार करण्यास पुढे येणे गरजेचे आहे. – नवनाथ जगताप (पोलीस उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंध, पालघर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *