
बोईसर जवळील वारांगडे येथील धक्कादायक घटना
सचिन जगताप,पालघर,प्रतिनिधी,दि.७ फेब्रुवारी
सिगारेटच्या क्षुल्लक वादातून एका दुकानातील दुकानदार यांच्यासह त्याचे वडील व काका यांना केलेल्या जबर मारहाणीमध्ये दुकानदाराचे वडील विनोद कुमार ओमकारनाथ सिंग याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोईसर जवळील वारांगडे गावात रविवारी रात्री ही घटना घडली आहे.या घटनेत दोघे जखमी आहेत.
बोईसर पूर्वेला वारांगडे गावात सतेन्द्रकुमार याचे किराणा मालाचे दुकान आहे. त्याच्यासोबत त्याचे रिक्षाचालक वडील विनोद सिंग हे काही महिन्यांपूर्वी त्याच्याकडे आले होते. रविवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास गावातीलाच तीन ते चार तरुणांनी किराणा दुकानाजवळ येऊन सतेन्द्रकुमार याच्याकडे सिगारेट्सची मागणी केली. दुकान बंद झाल्याने सिगारेट्स देण्यास सत्येंद्र याने मनाई केली. त्यावेळी तरुणांनी बाचाबाची केली. त्यानंतर हे तरुण तेथून निघून गेले. रात्री ११.३० वाजेच्या सुमारास सिगारेट मागण्यासाठी आलेले तरुण व त्यांच्यासोबत अजून १५ ते २० जणांच्या जमावाने सिगारेटच्या वादवादीचा राग मनात ठेवून सतेन्द्रकुमार यांच्या किराणा दुकानावर हल्लाबोल चढवला. शटर व खिडकी तोडून घरात घुसले. घरात झोपलेल्या तिघांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत विनोद सिंग यांच्यावर जोरदार हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जखमी सतेन्द्रकुमार आणि आनंद सिंग यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहीती पोलिसांनी दिली.या हत्या प्रकरणी संशयित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.