

‘शिकाल तर टिकाल,’ याची पुरती जाण सुदाम बिस्तीर पाटील यांना होती. म्हणूनच आपण शिकले पाहिजे; आपला समाज शिक्षणाभिमुख झाला पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. तसा तो व्हावा म्हणून त्यांनी स्वतःला शैक्षणिक कामांत झोकून दिले होते. समाजातीलच नव्हे; तर समाजाबाहेरील एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये; त्याच्या शिक्षणात अडथळा येऊ नये; याकड़े त्यांचे लक्ष होते. त्याकरता ते मुक्त हस्ते मदत करत होते.
अशा ध्येयवादी विचारांतून समाजाला आणि कुटुंबाला पुढे नेणारी; त्याची प्रगती पाहू धडपड़णारी व्यक्ती अचानक आपल्यातून निघून गेली की; कुटुंबांचे पर्यायाने समाजाचे मोठे नुकसान होते. असेच न भरून येणारे नुकसान समाजसेवक म्हणून ओळख असलेल्या सुदाम पाटील यांच्या अचानक जाण्याने झाले आहे. मंगळवार; १३ ऑक्टोबर रोजी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
विरार-मनवेलपाड़ा गावात १५ एप्रिल १९४५ रोजी जन्म त्यांचा झाला होता. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. आईवडील शेतकरी. आजूबाजूचे एक-दोन आदिवासी पाड़े आणि २५-५० लोकवस्तीचा तेव्हाचा मनवेल पाड़ा गांव. सगळे शेतीत रमणारे; त्यामुळे शिक्षणाचे वारे या ठिकाणी तितकेसे नव्हते.
पण घरची गरिबी दूर करायची तर आपण मात्र शिकलेच पाहिजे; यावर सुदाम पाटील यांचा दृढ़ विश्वास होता. त्यामुळे आईवडिलांना शेतीत मदत करण्यासोबतच त्यांनी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. विरार येथील अण्णासाहेब वर्तक यांच्या विद्यामंदिर या शाळेत त्यासाठी त्यांनी प्रवेश घेतला.
नेटाने आणि जिद्दीने अभ्यास करतानाच तेव्हाची मैट्रिक परीक्षा ते चांगले मार्क घेऊन उत्तीर्ण झाले. ही परीक्षा पास होणारे तेव्हा ते समाजातील पहिली व्यक्ती होते. तेव्हा त्यांच्या निकालाची बातमी वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली खरी; पण आपल्या यशाची बातमी वर्तमानपत्र खरेदी करून वाचावी इतके पैसेही त्यांच्याजवळ तेव्हा नव्हते.
पुढे नोकरीचे महत्त्व लक्षात घेऊन ते मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य विभागात आरोग्य अधिकारी या पदावर रुजू झाले. नोकरी करत असतानाच त्यांनी बीएची पदवीही संपादन केली. यानिमित्ताने थोड़ीफार स्थिरस्थावरता आली तरी त्यांच्यातील समाजाभिमुख माणूस; सामजिक कार्यकर्ता मात्र आतून अस्वस्थ होता. त्यामुळे नोकरीतून उरणारा वेळ समाजकार्यासाठी कारणी लावायचा, असा निश्चय त्यांनी केला.
इथूनच त्यांच्या समाजसेवेला खरी सुरुवात झाली. त्याकरता ते मनवेलपाड़ा जिल्हा परिषदेच्या शाळेचा आढावा घेऊ लागले. गावातील सजग, प्रतिष्ठित नागरिक म्हणून शाळेच्या बैठकांना हजर राहू लागले. त्यातून शाळेच्या आणि शाळेत येणाऱ्या मुलांच्या समस्या जाणून घेऊ लागले. गरज वाटल्यास स्वतःहून शाळेला मदत करू लागले.
शाळेतील गरजवंत मुलांना साहित्य, कपड़े वाटप असे कार्यक्रम मग त्यांच्या हातून नेहमीच होत गेले. हे कार्य करताना गावात सुधारणा होतील, याकडेही त्यांचे कटाक्षाने लक्ष होते. यातूनच मग गावात किंवा आजूबाजूच्या आदिवासी पाड़े असोत; इथे वीज, रस्ते व्हावेत म्हणून तत्कालीन ग्रामपंचायतीत सहकाऱ्यांसोबत त्यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे गावात त्यांचा शब्द प्रमाण मानला जाऊ लागला. त्यामुळे ते गावचे मार्गदर्शक बनले.
मनवेलपाडा गावातील दत्तमंदिरच्या निर्मितीसाठी त्यांनी उद्दात्त मनाने मोठी देणगी दिली होती. यामागे त्यांची देवावरील श्रद्धा आणि आपल्या वाईट परिस्थितीत त्यांना देवाने दिलेले बळ याची जाणीव होती.
अशीच जाणीव आणि नितांत श्रद्धा त्यांची समस्त वसई-विरारकरांचे श्रद्धास्थान असलेल्या आई जीवदानीवर होती. त्यामुळे त्यांनी जीवदानी मंदिर ट्रस्टकडून होणाऱ्या समस्त कामांत कधीच हात आखड़ता घेतला नाही. आपल्याला जे मिळाले, ते तिच्या कृपेने, या भावनेतून त्यांनी जीवदानी ट्रस्टच्या प्रत्येक कामासाठी सढ़ळ हस्ते मदत केली होती.
जीवदानी ट्रस्टनेही त्यांच्या या सामजिक कार्याची दखल घेऊन त्यांची ट्रस्टवर निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करून त्यांचा गौरव केला होता. याच कामातून सुदाम पाटील यांना अण्णा अशी ओळख मिळाली होती.
कोणतेही सामजिक काम हातात घेतले की; त्या व्यक्तीचा कमी-जास्त प्रमाणात राजकारणाशी संबंध येतोच! अर्थात; हे राजकारणही समाजाभिमुख असले पाहिजे, अशा या व्यक्तीचा मात्र आग्रह असतो.
सुदाम पाटील अर्थात अण्णा यांचाही असाच आग्रह होता. त्यामुळे ते तेव्हा मित्रमंडळींसोबत तेव्हाच्या काँग्रेससोबत जोडले गेले.
भास्कर ( भाऊ) ठाकूर, मनुभाई शहा यांच्यासोबत त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. तेव्हा ते मित्रमंडळीसोबत त्यांच्यासोबत काम करत होते.
पुढे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी बहुजन विकास आघाड़ीची स्थापना केली; तशी तेही काँग्रेसपासून वेगळे झाले आणि बहुजन विकास आघाड़ीसाठी काम करू लागले. तेव्हापासून आजपर्यंत बहुजन विकास आघाड़ीचे एकनिष्ठ आणि विश्वासू कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख कायम राहिली.
२०१४मध्ये आपल्या गावात बहुजन विकास आघाडीचे दोन नगरसेवक निवडून आणण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या माध्यमातून गावच्या आणि शहराच्या विकासासाठी ते धडपड़त होते. गावच्या-शहराच्या विकासानेच ते प्रेरित होते.
समाजातल्या, कुटुंबातल्या किंवा नातेवाईकांच्या समस्या त्यांना अस्वस्थ करत. त्यामुळे कुणाला काही समस्या आहे; अशी जाणीव जरी त्यांना झाली तरी ते स्वतःहून पुढे होऊन मदत करत होते.
याच त्यांच्या प्रेमळ, समंजस, संयमी स्वभावाने समाजाबरोबरच आपले कुटुंबही तन्मयतेने जपले. एकत्रित कुटुंबाचे महत्त्व त्यांना कळत होते; म्हणूनच त्यांनी आपले कुटुंब कधी दुभंगू दिले नाही. त्यामुळे ७० जणांच्या कुटुंबाचा रहाटगाड़ा ते या वयातही सांभाळत होते
यातून त्यांनी मोठ्या प्रमाणात आपला असा मित्रपरिवार गोळा केला होता. विशेष म्हणजे स्वतः पंच्याहत्तरीकडे झेपावत असताना हा प्रगल्भ माणूस आपल्यातील बालपणही तितक्याच तन्मयतेने जपून होता. म्हणूनच त्यांनी आपल्या शालेय मित्रांसोबतचे ऋणानुबंध कायम जपले होते.
त्यातून त्यांच्या या बालसंवगड्यांसोबत नेहमीच भेटीगाठी होत होत्या; यामागे केवळ मौजमजा हाच उद्देश नव्हता; तर त्यांच्या समस्या-अड़ीअडचणी समजून घेऊन वेळप्रसंगी मदत करणे, हा उद्दात्त हेतू होता.
अण्णाना बालपासून स्विमिंगची आवड़. ही आवड़ त्यांनी आपल्या उतारवयातही जपली. स्विमिंगला जाण्याच्या वेळाही त्यांनी त्यासाठी ठरवून ठेवल्या होत्या.
तितकीच ओढ़ त्यांना क्रिकेटप्रति होती. दत्तगुरू क्रिकेट संघाचे उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची त्या वेळी पंचक्रोशीत ओळख होती. क्रिकेटप्रेमी अण्णाचा स्वयंपाकातही हातखंडा होता; कधी कधी घरी येणाऱ्या मित्रमंडळीसाठी-नातेवाईकांसाठी स्वतःहून चहापाणी किंवा जेवणाचा बेत बनवायचे. त्यासाठी लागेल ती वस्तू बाजारातून निवडून आणायची जबाबदारीही मग त्यांचीच असायची, अशा आठवणी त्यांचे काही मित्र सांगतात.
प्रचंड गरिबीतून आलेल्या अण्णानी आपल्या उतारवयात जगभ्रमंती करून जगही समजून घेण्याचा प्रयत्न केला होता.
नुकत्याच झालेल्या लॉकड़ाउनदरम्यान जीवदानी ट्रस्टच्या अन्नछत्र कार्यक्रमात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. असेच योगदान त्यांनी आपल्या आगरी समाजासाठी दिले होते.
समाज आणि कुटुंबवत्सल अण्णाच्या जाण्याने मात्र या दोघांची ही अपरिमित अशी हानी झाली आहे. ही हानी न भरून येणारी आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबाचा आणि समाजाचा आधारवड हरपला आहे.