
मी लवकरच बरा होऊन, राहून गेलेले मायबोलीच्या सेवेचे कार्य माझ्यापरीने पूर्ण करीन!—–फा. फ्रान्सिस दिब्रिटो
९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांचे जानेवारी २०२० मध्ये “एल फोर” या पाठीच्या दु:खण्यावर होली फॅमिली हॉस्पिटल, वांद्रे, मुंबई येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर वर्षभर ते उपचार आणि विश्रांती घेत होते. त्याच्यातून त्यांनी हळूहळू उभारी घेतली. मात्र साधारण मार्च २०२१ ह्या महिन्यात फादराना पुन्हा वेदना होऊ लागल्या. त्यांना पुन्हा होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यांच्या निरनिराळ्या तपासण्या केल्या, बायोप्सी केली. मग डॉक्टरांना समजून आले की, फादरांना “मल्टिपल मायलोमा” हा रक्ताच्या गाठी होण्याचा विकार झालेला आहे. विधात्याने त्यांना या व्याधीतून लवकर मुक्त करून, त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांचा लाभ सतत आम्हावर होत राहो, अश्या प्रार्थना आपण करूया….

फा.रेमण्ड रुमाव यांच्या साहाय्याने फादर दिब्रिटो यांच्याशी तब्बेतीच्या चौकशी निमित्त त्रोटक संवाद झाला. फादर काहीसे भावुक पण ठणठणीत वाटले. साहित्य संवर्धन आणि मराठी भाषा संवर्धनासाठी राज्यभर फिरून, स्वतःच आखलेला नियोजित कार्यक्रम राबविता न आल्याची खंत त्यांनी फोनवरून बोलून दाखवली आहे. मी लवकरच बरा होऊन, राहून गेलेले मायबोलीच्या सेवेचे कार्य माझ्यापरीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन, अश्या भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद पदरी येऊनही संमेलनाच्या उदघाटनानंतर दुर्दैवाने संपूर्ण वर्ष फादर दिब्रिटो यांचे उपचारात आणि डॉक्टरांनी घातलेल्या मर्यादा पाळण्यात गेले. उस्मानाबादेत संमेलनाचे उदघाटनही व्हीलचेअरवर बसूनच त्यांना करावे लागले. आपण हजारो वसईकर या अभिमानास्पद प्रसंगाचे साक्षीदार झालो होतो. त्यावेळी प्रमुख भाषणातील फादरांची सामान्य माणसाच्या जगण्यातील संघर्ष, पर्यावरण, मराठी भाषा आणि साहित्य या विषयीची तळमळ महाराष्ट्राने अनुभवली. मात्र नंतर फादरांना उपचार आणि विश्रांती यातून सुटका मिळाली नाही. वसईतील एखाद-दुसरा अतीमहत्वाचा प्रसंग अपवाद असेन, असेच ते उपस्थित राहिले. किमान 25 वर्षांपासूनच्या आमच्या परस्पर स्नेह आणि लोभाचा भाग म्हणून फादर अत्यवस्थ असूनही एकविसाव्या “लीलाई दिवाळी अंका”च्या ऑक्टोबर 2020 मधील प्रकाशनास नकार देऊ शकले नाही. त्यावेळी तासभर रंगलेल्या आमच्या गप्पा आणि लीलाईच्या वाटचालीबद्दल तोंडभरून त्यांनी केलेले कौतुक आज प्रकर्षाने आठवत आहे.फा. दिब्रिटो वयाच्या 78 व्या वर्षी आता नव्याने त्यांना गाठलेल्या “मल्टिपल मायलोमा” या रक्ताच्या गाठी होण्याच्या विकाराशी झुंज देत असून, वसई आणि राज्यभरातील त्यांच्या चाहत्या वर्गात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे औषध उपचार चालू असून त्यामूळे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. परंतु ही व्याधी पूर्णपणे बरी होण्यास वेळ लागेल.असे डॉक्टरांनी सांगितले. आता फा. दिब्रिटो हे नंदाखाल, विरार (प ) येथील आपल्या निवासी उपचार घेत असून, त्यांना केमोथेरेपी चालू केलेली आहे. तिलाही फादर चांगला प्रतिसाद देत आहेत. सध्या सर्वत्र कोरोनाचे वातावरण असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फादर कुणाला भेटू शकत नाहीत. त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ते कोणाला भेटू इच्छित नसल्यामुळे आपल्या सदभावना फादरांच्या पाठीशी असू द्याव्यात, असे त्यांचे भाचे, फा. रेमण्ड रुमाव यांनी आज सांगितले. आपण त्यांच्या हिताकरिता, त्यांची भेट किंवा संपर्क साधण्याच्या मोहापासून दुर राहून, त्यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करूया.