
पालघरःसोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनूभवी विधीतज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी अनूभवी विधीतज्ञांच्या तोंडून ऐकता याव्यात,अनूभवी विधीतज्ञांचे रोजच्या जीवनात येणारे “रिअल लाईफ” अनूभव ऐकता यावे आणि विद्यार्थ्यांच्या न्यायालयीन कामकाजाविषयीच्या शंका दूर व्हाव्यात ह्या उद्देशाने महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.पायल चोलेरा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. ह्या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या अँड. दर्शना त्रिपाठी ह्यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.विधी क्षेत्रातील १५ वर्षांपेक्षा जास्त अनुभव असलेल्या अँड.त्रिपाठी ह्यांनी,जामीन (बेल) म्हणजे काय जामीनाचे विविध प्रकार,बेल अॅप्लिकेशन ईत्यादि बाबत सखोल विश्लेषण तसेच विधीक्षेत्रातील काळानुसार बदलत्या संधी, नवनवीन आव्हानांना सामोरे जाण्याचे कसब आदिबद्दल इंत्यंभुत माहिती दिली.
पालघर जिल्ह्यातील पहिले विधी महाविद्यालय म्हणून नावारूपाला आलेल्या सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाने मागील वर्षभरात विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून इतर महाविद्यालयांना दखल घेण्यास भाग पाडलेले आहे.
स्वच्छता मोहीम,पथनाट्य,विधी सहायता मार्गदर्शन,अभिरूप न्यायालय, न्यायालयातील प्रत्यक्ष कामकाजाचे मार्गदर्शन, कारागृह भेट,मानव अधिकार इत्यादी लोकाभिमुख उपक्रमांचे अत्यंत प्रभावीपणे सादरीकरण करण्यात आले.
त्याआधी विद्यार्थ्यांना संसदेचे, सर्वोच्च न्यायालयाचे आणि मानव अधिकार आयोगासारख्या आस्थापनांचे कामकाज बघता यावे म्हणून दिल्ली दौरा तसेच ठाणे येथिल मध्यवर्ती कारागृह भेट आयोजित करण्यात आली होती.
नविन शैक्षणिक वर्षातही असेच कार्यक्रम सुरु ठेवण्याचा चंग बांधत त्याची सुरुवात म्हणून ह्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ह्या शिबीरात विधी शाखेतील जवळजवळ ९५ विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.
लवकरच महाविद्यालयाच्या आवारातच विधी सहाय्यता केंद्र सुरु करुन समाजाच्या सर्व स्तरामधे न्यायसंस्थेबद्दल जागृती निर्माण करणे,तळागाळातील जनतेपर्यंत न्यायव्यवस्था पोहचवणे ह्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे प्राचार्य डाँ. चोलेरा ह्यांनी सांगितले
