
पालघर. दि. २३ एप्रिल, २०२०.
देशात पसरलेल्या कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रशासनाच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. *दक्ष विधी विद्यार्थी* ह्या संकल्पने तून प्रशासनाची विविध प्रकारे मदत करण्याचा ह्या विद्यार्थ्यांचा मानस आहे.
विधी शाखेचा अभ्यास करताना मिळविलेल्या कायदे विषयक ज्ञानाचा वापर करुन अफवांवर अंकूश ठेवण्याचे काम ह्या विद्यार्थ्यांनी सुरु केले असुन समाज माध्यमांवर कार्यरत राहून व्हाट्सअँप व फेसबुक वर पोस्ट होणाऱ्या अफवांना तिथल्या तिथे पायबंद घालून त्या डिलीट करुन घेणे किंंवा सायबर पोलीसांच्या मदतीने अफवा पसरविणार्या व्यक्तींवर कारवाई करणे. अशा प्रकारची कामे ह्या विद्यार्थ्यांनी “दक्ष विधी विद्यार्थी” ह्या संकल्पनेतून सुरु केली आहेत.
तसेच समाज माध्यमांवरुन मिळालेली माहीती शासकीय यंत्रणांकडून पडताळून घेणे. प्रशासन, आरोग्य यंत्रणा,स्वंयसेवी संस्था व पत्रकार यांच्या समन्वयातून योग्य वेळी योग्य माहिती प्रसारित करून लोकांमध्ये जनजागृती करणे हे ह्या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट असल्याने अफवांवर काही प्रमाणात अंकूश लागणार आहे.
त्याच प्रमाणे आपापल्या विभागातील रेशनिंग दुकानांवरही हे विद्यार्थी लक्ष ठेवणार असून गरजूंना अन्नधान्याचं वाटप योग्य प्रकारे करण्यात यावं ह्यासाठी आग्रह धरणार आहेत.
कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने ठरवलेले विविध झोन आणि त्यातील नियमांचे काटेकोर पालन व्हावे ह्याकडे हे विद्यार्थी लक्ष देणार असून त्याद्वारे एका झोन मधून दुसऱ्या झोन मधे होणाऱ्या चोरट्या वाहतूकीला आळा बसेल असे विद्यार्थ्यांचे मत आहे.
ह्या दक्ष विद्यार्थ्यांनी स्वतः पैसे गोळा करुन ज्यांच्या कडे रेशन कार्ड उपलब्ध नाही अशा गरजू लोकांना आवश्यक किराणा सामान पुरवण्याचे कामही सुरु केले आहे. त्यांच्या आवाहनाला शिवसेना केळवा शाखा व काही दानशूर व्यक्तींनीही प्रतिसाद दिला आहे. आत्तापर्यंत ह्या विद्यार्थ्यांनी पालिपाडा,मोरपाडा,भट्टीपाडा,सुभाषनगर,मांगेल आळी,बारीवाडा,तेलीवाडा,खारोडी,दांडे, खटाळी,अंबोडे ह्या भागातील १६० गरजू कुटुंबांना जवळ जवळ दहा दिवस पुरेल एवढ्या किराणा सामानाचे वाटप केले आहे.
हा दक्ष विधी विद्यार्थी संकल्पनेचा प्रशासनाला नक्कीच फायदा होईल अशी विद्यार्थ्यांना आशा आहे.