
नालासोपारा :- सर्वसामान्य नागरिकांपासून ते राजकीय नेते, मोठे अधिकारीही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येत आहेत; परंतु आता पोलिसांनासोशल मीडियाचा वापर करताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे. त्यांच्या चक्क आचारसंहिताच लागू केली आहे. याबाबतचे आदेश महासंचालकांनी नुकतेच काढले आहेत. सोशल मीडियामुळे प्रशासकीय काम अधिक गतिमान व सोपे झाले. परंतु अनेकजण अनावश्यक पोस्ट करताना दिसून येतात. यासाठी पोलीस महासंचालकांनी सोशल माध्यमांच्या वापराची आचारसंहिता तयार केली. त्यामुळे सोशल मीडियावर पोलिसांना सांभाळू व्यक्त व्हावे लागणार आहे.
सध्याच्या काळात सोशल मीडिया हा समाजाचा आरसा झाला आहे. आपल्या आयुष्यातील चांगल्या, वाईट गोष्टी आवर्जून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्वीटर, इन्स्टाग्राम अशा विविध ऍप्सवर शेअर केल्या जात आहेत. या आभासी जगाची आता सर्वांना भुरळ पडू लागली आहे. त्याला कोणीही अपवाद नाही. सोशल मीडियाचा वापर विधायक कामांसाठी केला, तर तो नक्कीच चांगला आहे; मात्र त्यातून अनेकदा विध्वंसक कृत्येही केली जातात.
दर महिन्याला होणार प्रोफाईलची तपासणी
विशेष पोलीस महानिरीक्षकांनी घालून दिलेल्या आचारसंहितांचे उल्लंघन होत आहे का, हे पाहण्यासाठी दर महिन्याला प्रोफाईलची तपासणी करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी तसेच अंमलदारांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
पोलिसांसाठीही आचारसंहिता
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ मधील तरतुदीचे काटेकोरपणे पालन करावे. पोलिसांची प्रतिमा कोणत्याही प्रकारे कुठेही मलीन होईल. असे कृत्य, वर्तन होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. पोलीस खाते शिस्तप्रिय असून, कायद्याची अंमलबजावणी करत गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये पोलिसांचा धाक असावा. २३ सप्टेंबरला यासंदर्भात आदेश काढण्यात आला आहे.
पोलीस आयुक्त ठेवणार वॉच
पोलीस अधिकारी व कर्मचारी काही वादग्रस्त पोस्ट करतात का, सोशल मीडियावर विशिष्ट राजकीय पक्षांच्या प्रभावाखाली आपली काही मते व्यक्त करतात का, यावर पोलीस आयुक्त वाॅच ठेवणार आहेत. त्यामुळे आता सांभाळून सोशल मीडियाचा वापर करावा लागणार आहे.
शिस्तीत राहणे बंधनकारक
पोलीस खाते शिस्तप्रिय आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर तसेच खाकी वर्दीत असताना त्यांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यासाठी नुकतीच विशेष पोलीस महानिरीक्षकांनी नुकतीच आचारसंहिता जाहीर केली आहे.- पोलीस प्रशासन