
विरार : वसई-विरार शहरात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी रहिवाशी गृहसंकुल, सोसायटी आणि गृहनिर्माण संस्था यांनी आपल्या आवारात ‘हॅंडवॉश स्टेशन’ उभारावे; अन्यथा प्रतिदिन दंड ठोठावण्यात येईल, असा तुघलकी निर्देश महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी जारी केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
जगभरात कोविड-१९चा जगभरात वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारने काही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वाचा भाग म्हणून वसई-विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी सोसायटी आवारात ‘हॅंडवॉश’ स्टेशन उभारण्याचे निर्देश दिले आहेत. या तत्त्वाचा अवलंब न करणाऱ्या सोसायटीला प्रतिदिन दंड आकारण्यात येणार आहे. तशा नोटिसच महापालिकेने संपूर्ण शहराला बजावल्या आहेत.
मात्र आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिलेले निर्देश तुघलकी असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटल्या आहेत.
वसई-विरारमधील काही गृहसंकुले आजही पाणीटंचाईशी झुंजत आहेत. ही संकुले ‘हॅंडवॉश स्टेशन’साठी पाणी कसे काय उपलब्ध करून देणार? असा प्रश्न नागरिकांनी केला आहे. तर झोपड़पट्टी भागात ही संकल्पना कशी राबवणार? असा प्रतिप्रश्नही नागरिकांनी आयुक्ताना केला आहे.
उलट अशा ‘हॅंडवॉश स्टेशन’च्या सार्वजनिक वापरातूनच कोविड-१९चा संसर्ग जास्त होईल, अशी शक्यताही काही नागरिकांनी बोलून दाखवली आहे.
मुळात ‘हॅंडवॉश स्टेशन’ न उभारणाऱ्या गृहसंकुल, सोसायटी आणि गृहनिर्माण संस्था यांना प्रतिदिन दंड आकारण्यात येईल, असा आयुक्त गंगाथरन डी. यांनी दिलेला दमच नागरिकांच्या पचनी पडलेला नाही.
विशेष म्हणजे; हा निर्णय घेण्याआधी महापालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि अन्य लोकप्रतिनिधी यांना विश्वासात घेणे आवश्यक होते; तसा तो घेतलेला नाही.
त्यामुळे आयुक्तांनी एककल्ली घेतलेला हा निर्णय तुघलकी आणि वसई-विरारकरांवर अन्याय करणारा असल्याची प्रतिक्रिया काही सोसायटी सदस्यांनी दिली आहे.