माझा मामेभाऊ स्टिफन परेरा आज कालावश झाला.नेहमीप्रमाणे सोमवारची शिदोरी त्याने बांधली.बँग भरुन कार्डिनल ग्रेशस मेमोरिअल हाँस्पिटलमध्ये जाण्यासाठी तयारी पुर्ण केली.तेव्हढ्यात त्याचा छातीत कळ आली.आमच्या मामीला त्याने हाक मारली.जाऊन दादाला(विल्सनला)बोलाव असे सांगितले. मामी विल्सनला घेऊन घरी परतण्याअगोदर स्टिफन देवाघरी गेलेला होता.बहुतेक कार्डियाक अरेस्टचा हा प्रकार असावा.आता ५२ वर्षांचे वय काही मोठे वय मानले जात नाही. स्टिफन ५२ व्या वर्षी स्वर्गस्थ झाला. तरीही त्याची सुटका झाली असा विचार माझ्या मनात आला.आम्ही लगोलग स्टिफनच्या घरी पोहचलो.मामी तेथे धाय मोकलुन रडत होती.ते बरोबरही आहे.कोणत्या आईला आपला मुलगा आपल्या अगोदर जावा असे वाटेल?माझ्या मनात मात्र विचारांचे दुसरेच चक्र चालु होते.
नुकताच मी यु-ट्युब वर एक व्हिडीओ पाहत होतो.Universe is pure Mathematics या सिद्धांतावर हा कार्यक्रम चित्रीत करण्यात आला होता.विश्व गणितावर कसे आधारित आहे याचे सुरेख वर्णन त्यात केले होते.विशालकाय आकाशगंगांचा चक्राकार आकार आणि सुक्ष्म गोगलगाईच्या शंखेचा चक्राकार आकार यातील साम्य, पानावर असणार्या रेखांचे जाळे आणि मज्जारज्जुंचे जाळे यातील साम्य, ठरवुन बनलेले आहे असे त्यात ठासुन सांगण्यात आलेले होते.थोडक्यात सगळे विश्व रचुन ठेवलेल्या एका गणिताचा भाग असुन त्यातील प्रत्येकाची भुमिका अगोदरपासुन ठरवलेली आहे हे त्यात दाखविण्याचा प्रयत्न होता.आपण उगाचच चिंता करीत बसतो.सगळ काही ठरवुन चाललेले आहे. असे त्या व्हिडीओतुन सुचित करण्यात आलेले होते.स्टिफनच्या जिवनाकडे पाहिल्यावर ते खरेच असेल का हा प्रश्न मनाला पडला.
स्टिफन माझा धाकटा मामेभाऊ.थोरला दादा आणि पाच बहिणी यांच्या पसार्यात स्टिफन वाढला.भुईगावात हे कुटुंब वाढले.आमच्या मामाच्या दु:खण्याने मामीचा संसार मेटाकुटीला आला होता.मामीने विल्सनच्या आधाराने हा संसार पुढे रेटला.यथावकाश कुटुंबाला स्थैर्य आले.त्यात स्टिफनचे वेगळेपण स्पष्टपणे दिसु लागले.मुलत:धार्मिक व्रुतीचा असल्याने त्याने सेमनेरीचा रस्ता पकडला.कोमल स्वभावाच्या स्टिफनला ते जीवन झेपले नाही. हळुच तो बाहेर उतरला आणि त्याने शिक्षकी पेशा स्विकारला.लग्नाचे वय झाल्यानंतर आज्ञाधारक मुलाप्रमाणे त्याने लग्नही केले.तेथेही त्याला अपयश आले.त्यानंतर स्टिफनने स्वतःला त्याच्या पेशात झोकुन दिले.त्यात त्याने मोठे यश मिळविले. मुबंईमध्ये मराठी शिकवणीसाठी स्टिफनला सर्वांची पहिली पसंती होती.माझी मुलं राज आणि जाँर्ज दोघेही स्टिफनच्या तालमीत तयार झाली. सगळे काही व्यवस्थित चालु होते.परंतु ईथेही शत्रु दबा धरुन बसला होता.२०११ ला मी दिल्लीला चाललो होतो.मध्यरात्री विल्सनचा फोन खणखणला.दुसर्या दिवशी स्टिफनला मुत्रपिंडाचा दुर्धर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. कालवारीचा डोंगर चढुन जाण्याची ती सुरुवात होती.
हे सर्व पाहिल्यानंतर मनात एक विचार चमकुन जातो.एखाद्याच्या पदरी हे ईतके नकारात्मक(negative) जीवन का?की त्या व्हिडीओतील म्हणणे खरे? सगळचं ठरवुन होतयं म्हटलं तर हे सगळं असच चालणार. ज्याचे त्याचे स्थान आणि नशीब यावर त्याचे भाग्य ठरलेले असणार.तुम्ही मी त्यात काही बदल करु शकणार नाही.
पण या गणितातही न दिसणारे एक गणीत आहे.स्टिफनच्या नशिबात सुखाच्या क्षणांऐवजी दु:खाची ओझी वाहण्याचे काम आले होते.स्टिफनने मात्र विनातक्रार आपले नशीब स्विकारले. त्या गणीताचाही त्याने पराभव केला.आयुष्यात वैफल्यतेचे अनेक अनुभव घेतलेला स्टिफन नेहमी हसतमुख राहिला.आपल्या नशीबाची किंवा आजाराची त्याने कधीही तक्रार केली नाही. दररोज सकाळी आम्हाला आध्यात्मिक संदेश पाठवत राहिला.म्रुत्युअगोदर केवळ एकतास तसा संदेश त्याने आमच्या व्हाँट्स अपवर पाठवला.जणु सोमवारचा डायलेसीसचा दिवस म्हणजे विजयाचा दिवस असल्यासारखे त्याने दाखवले.
त्याचे अंत्यदर्शन घेण्यासाठी जेव्हा आम्ही त्याच्या घरी पोहचलो तेव्हा त्याच्या चेहर्यावर तेज पसरलेले होते.त्याचा तेजपुंज चेहरा जणु आम्हाला सांगत होता’अखेरीस मीच जिंकलो बरं का’.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *