

स्त्री शक्ती म्हणजे शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप…
संपूर्ण निर्मिती माता आदिशक्तीच्या गर्भातून प्रकट झाली.प्राचीनकाळी मानवाने निसर्गशक्तिलाच दैवत मानले.शेतीचा शोध हा मानव जातीतील सर्वात क्रांतीकारक शोध.शेतीमुळे माणसाचे भटके जीवन स्थिर झाले.आणि धरणीच्या ठिकाणी असलेल्या सुजलाम – सुफलाम गुणांची ओळख झाली.तेव्हापासूनच मातृदेवतेच्यां पूजेचं महत्व वाढले.स्त्रीकडे ही बिजधारणेचा गुण असल्यामुळे तिलाही आदिशक्ती मानून तिची पूजा केली जाऊ लागली. कालांतराने पुरुष सत्ताक व्यवस्था वाढत गेली.आणि एकीकडे स्त्रीची पूजा तर दुसरीकडे तिचा छळ असं सर्व वाढतच गेलं.प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते.
सदाचाराने लढाई जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांचं संगोपन जिजाबाईंनी केलं.येशुंना त्यांचे ज्ञान त्यांच्या आईकडून प्राप्त झाले. एक स्त्री स्वतःच्या चिकाटीने असिम असे साध्य करू शकते.हे पार्वतीने शिवाचे पतीरुपाने काळीज जिंकून दाखवून दिले आहे.आपल्या प्राचीन लोकांनी याला मान्यता दिली म्हणून वैदिक काळात स्त्रियांना उच्च आदर दिला जात होता. एक वैदिक म्हण आहे,”जिथे स्त्रियांना पुजले जाते तिथे देव वास करून असतात.”
*शहर असो किंव्हा गाव आजच्या तरुणी कुठेही सुरक्षित नाहीत.मग मनात राहून राहून एकच प्रश्न निर्माण होतो की याला जबाबदार कोण?* आधी दिल्लीतील आत्याच्याराचे प्रकरण घडले.त्यानंतर आंदोलने झाली.नंतर कोपर्डीचे प्रकरण घडले.आणि हल्लीच उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये दलीत तरुणीवर निर्भयासारखे क्रूर कृत्य केल्याची घटना उघड झाल्यानंतर राजकारण तापलं आहे.सोशल मीडियावरून देखील नागरिकांचा अक्रोश दिसून येत आहे.किती भयानक आहे हे सगळं? एका पाठोपाठ कित्येक मुलींवर अत्याचार होतायेत.आज ही महिलांमध्ये भेदभाव केला जातो.अगदी किरकोळ कारणानी संसारामध्ये कुरबुरी वाढतात.हुंडाबळी सारख्या घटना घडतात.या गोष्टी टाळण्यासाठी महिलांनी पोलिस स्टेशनचा आधार घेणं गरजेचं आहे.कायद्याची जी भीती महिलांच्या मनात आहे ती सर्वप्रथम दूर झाली पाहिजे.महिलांनी स्वतःच योग्य निर्णयावर ठाम राहून समाजात निर्भिडपणे वावरले पाहिजे.
आज ती चुल व मूल सांभाळुन पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे.आजही मुलींच्या जन्मांचे मनापासून स्वागत होतच असं नाही. स्त्रीभ्रूण हत्येला कायद्याने लगाम घातला असला तरीही तंत्रज्ञानाचा लाभ उठवीत कळ्यांना गर्भातच खुडण्याचा प्रकार लपून- छपून करणारे आहेतच. *आज अनेक महिला डॉक्टर,इंजिनिअर,शिक्षिका, अभिनेत्री,मंत्री,नेता अशा देशांच्या सर्वोच्च पदांवर आहेत.* त्याच वेळी दुसरीकडे गावात अनेक स्त्रिया मुलांना जन्म देताना मरतात,हुंड्याच्या अभावी जळतात.पण त्यांना न्याय मिळत नाही.त्यांच्या अधिकारांसाठी आंदोलने होत नाहीत असे का?जर आपण सर्वांगीण विकासाच्या गोष्टी करतो तर ह्या स्त्रियांचा विकास ही आपली जबाबदारी नाही का? आत्मविश्लेषण केल्यास ही जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. याची जाणीव ही आपल्याला होईल.
*मला असं वाटतं जेव्हा एक पुरुष शिकतो तेव्हा तो एकटाच सुशिक्षित होतो.मात्र जेव्हा एखादी महिला शिकते तेव्हा तिची पूर्ण पिढी सुशिक्षित होऊ शकते.ती आई आहे,ती ताई आहे,ती मैत्रीण आहे,ती पत्नी आहे,ती मुलगी आहे,ती जन्म आहे,ती माया* *आहे,ती सुरुवात आहे आणि तीच नसेल तर सारं काही व्यर्थ आहे.स्त्री म्हणजे वास्तव्य आणि स्त्री म्हणजे मातृत्व.म्हणूनच स्त्री शक्तीचा आदर करा
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️