
वसई-विरार शहरात करोना विषाणूचा आकडा वाढत असताना देखील, पालिकेचे स्वच्छता कर्मचारी दररोज शहर स्वच्छ करण्यात आपले योगदान देत आहेत. मात्र पालिकेकडे या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याच्या प्रकार समोर आला आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता कर्मचाऱ्यांना करोना विषाणूची लागण होण्याची भीती आहे.
करोनाच्या धास्तीने शहर लॉकडाऊन झाल्यापासून खाजगी वाहतूक, दुकाने बंद झाली आहेत. नागरिक सुद्धा रस्त्यावर उतरत नाही आहेत. मात्र शहर स्वच्छ करण्यासाठी पालिकेचे स्वच्छता कर्मचारी दररोज झटत आहेत. या कर्मचार्यांना शहरात स्वच्छता करताना करोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी, हातमोजे, मास्क, सॅरनिटाइज, साबन देण्यात आल्याचा दावा पालिका करत आहे. मात्र प्रत्यक्षात तसे चित्र दिसत नाही आहे. कारण आज महापालिकेच्या प्रभाग सी मधील ईधगा नाला आणि सहकार नगरमधील उघडा नाला सफाई काम हाती घेण्यात आले होते. या सफाईसाठी असंख्य सफाई कर्मचारी नाल्यात उतरले होते. मात्र त्यांच्या हातात मोजे, बूट, मास्क अशी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणारी कुठलीच बाब दिसून नाही आली. याउलट तोंडावर रुमाल बांधून मोकळ्या हाताने हे कर्मचारी काम करत होते. मात्र त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने कुठलीच काळजी घेतली जात नव्हती.
आधीच इतक्या भीषण महामारीतही नागरिक कुलुपबंद आहेत आणि हे कर्मचारी आपली चोख भूमिका बजावत आहेत. त्यामुळे त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने सुविधा पुरवणे पालिकेचे काम आहे. मात्र तसे होत नाही आहे. त्यातच प्रभाग सी स्वच्छता अधिकाऱ्याचा आहे. त्यामुळे जर स्वच्छता अधिकाऱ्याच्याच प्रभागात अशी कुचंबना असेल तर इतर प्रभागाची अवस्था याहूनही भीषण असेल असे नागरीकांचे म्हणणे आहे.
महापालिकेकडून स्वच्छता कर्मचाऱ्यांना हातमोजे, मास्क, सॅरनिटाइज, साबन देण्यात आला आहे. मात्र जर कर्मचारी मास्क, हातमोजे न वापरता काम करत असतील तर ठेकेदारावर कारवाई करण्यात येईल.
-वसंत मुकणे, स्वच्छता अधिकारी विरार