

(सुभाष सराफ) अशोक सराफ या कलाकाराची मागील पाच दशकातील अभिनयाची कारकीर्द पाहिली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते तीही की, भूमिका कोणतीही असो ती समरसून करायची,हा त्याचा कलेप्रती असलेला ध्यास आहे ,झपाटून टाकणं आहे असंच म्हणावं लागेल.
चित्रपटात अखंड बडबड करणारे,विनोदी भूमिका लिलया साकारणारे अशोकजी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अतिशय शांत व मितभाषी आहेत.
आपल्या बहुरंगी भूमिकांच्या माध्यमातून अभिनयकलेची आराधना सातत्याचे ५०वर्षे करणारा हा अभिनय सम्राट आपल्या अभिनयाने रसिकांना आंनद देत आलाय.
विनोदाचा हुकमाचा एक्का असणारे अशोकजी विनोदी भुमिकांत अडकून राहिले नाहीत.
विनोदीभुमिकांबरोबर,गंभीर ,खलनायकी भूमिकांवरही आपली वेगळी मोहोर उमटवली.त्यांच्या अशा पुरस्कारप्राप्त आणि रसिकमान्य सिनेमा यादी खूप मोठी आहे.
नाटक,चित्रपट,मालिकांतून आपल्या अभिनयाच्या विविध छटांचे दर्शन त्यांनी घडवले. मराठीप्रमाणे हिंदीतही आपला वेगळा दबदबा तयार केला.
मराठी रंगभूमी चित्रपटातील एक दमदार कलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टितही त्यांचे नाव अदबीने घेतले जाते.
अशोकजींच्या आजवरच्या सर्वच भूमिका पाहिल्या तर प्रत्येक व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास करून,त्या व्यक्तिरेखेची अचूक नस ओळखून साकारलेल्या या भूमिका रसिक प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेत राहिल्याचे दिसते.
१९७०-८०च्या दशकात अशोकजींनी जेव्हा चित्रपटातील कलाजीवनाची सुरुवात केली.
त्यावेळी बहुतांशी मराठी चित्रपट हे कोल्हापुरातील स्टुडिओत चित्रित होत होते.
‘पांडू हवालदार’ या चित्रपटानंतर मराठी चित्रपटसृष्टीसाठी अशोक सराफ चे नाव हुकुमाचा एक्का बनले , त्यामुळे त्यांच्याकडे चित्रपट निर्मात्यांची रांग लागली. प्रथमच निर्माते बनणाऱ्यांची संख्या यात लक्षणीय होती. अशा निर्मात्यांना सहाय्य करण्यासाठी कमी बिदागी घेऊन अशोकजीनी काम केलं.या निर्मात्यांना चित्रपटक्षेत्रात संधी देण्याचे काम तसे अनमोलच म्हणावे लागेल !त्यांचा माणुसकीचा हा पैलू खूप कमी लोकांना माहित आहे.
जवळपास आठ-दहा वर्ष अशोक जी कोल्हापुरातील स्टुडिओत सतत कार्यरत राहिले. तेथील कलाकारांना ,तंत्रज्ञांना काम मिळावे म्हणून त्यांच्या आवडत्या नाट्य क्षेत्रापासून या काळात त्यांना फारकत घ्यावी लागली होती.
या काळात असे काही चित्रपट निघाले की त्यांचा दर्जा सुमार होता . मात्र एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की या चित्रपटातील नायक खलनायक, विनोदी, भूमिका करताना
त्यांनी आपल्या भूमिका चोख वठवल्या. त्यातही काम करताना अशोकजीनी आपल्या भूमिकांशी कधीही तडजोड केली नाही .
या अष्टपैलू कलाकाराच्या अभिनयाची सुरुवात त्यांच्या वयाच्या सहाव्या वर्षापासून झाली.
अभिनय अभिनय आणि अभिनय हा एकच ध्यास !निरीक्षणशक्ती दांडगी! या त्यांच्या स्वभाववैशिष्ट्येमुळे त्यांच्या अभिनयाची कला एकलव्याप्रमाणे त्यांचे मामा आणि गुरु नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्याकडून त्यांनीआत्मसात केली.
नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार हे जुन्या काळातील प्रतिथयश नाट्यनिर्माता, दिग्दर्शक आणि अभिजात अभिनयाची देणगी लाभलेले एक प्रभावी व्यक्तिमत्व!
१९५० ते ७० च्या दशकात गोपीनाथ सावकार यांनी जुन्या संगीत नाटकांचे कालानुरूप संवर्धन केले.
त्याचप्रमाणे संगीत सुवर्णतुला संगीत ययाती आणि देवयानी यासारख्या नव्या अभिजात नाट्यकृती संगीत रंगभूमीला बहाल केल्या.
त्यांच्या ययाती आणि देवयानी या नाटकाद्वारे अशोकजींनी आपल्या नाट्य कारकिर्दीची सुरुवात केली.
मात्र खेदाची गोष्ट अशी १९७३साली गोपीनाथ सावकार यांचे निधन झाले आणि १९७४ साली पांडू हवालदार या चित्रपटामुळे महाराष्ट्रभरात अशोकजीचे नाव गाजू लागले.
आपल्या मामांना आपण काही मदत करू शकलो नाही याची खंत अशोकजींच्या मनात कायम राहिली.
रंगभूमीची अविरत सेवा करणाऱ्या आपल्या या गुरूला मानवंदना देण्यासाठी अशोकजींनी श्री गोपीनाथ सावकार स्मृति विश्वस्त निधी या संस्थेची स्थापना केली .या संस्थेचा मूळ उद्देश संगीत रंगभूमीची सेवा,संगीत नाटकाचे संवर्धन करणे आणि त्यातील कलाकारांना प्रोत्साहन देणे!
या संस्थेच्या माध्यमातून नाट्यसंगीत गायन स्पर्धा घेऊन अनेक नव्या कलाकारांना प्रोत्साहन देण्यात येते.
गेली तीन दशके ‘आदरणीय दिग्दर्शक’ हा पुरस्कार संस्थेच्या माध्यमातून उत्तम दिग्दर्शकाला दिला जातो आणि त्याची निवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची कार्यकारणी करते. त्याचप्रमाणे संगीत रंगभूमीवरील सेवेसाठी ‘जीवन गौरव पुरस्कार’, राज्य नाट्य स्पर्धेतील उत्कृष्ट दिग्दर्शकाला ‘गोपीनाथ सावकार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात येते . संगीत रंगभूमीवर कार्यरत असणाऱ्या संस्थांना श्री गोपीनाथ सावकार स्मृती विश्वस्त निधीच्या माध्यमातून वेळोवेळी सहकार्य व प्रोत्साहन दिले जाते.
अशोकजीनी काही कलाकारांच्या सोबत ‘कला संजीवनी’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून नाट्य ,चित्रपट ,मालिका याच्याशी संबंधित कलाकार ,तंत्रज्ञ जे दहा वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत अशांना वैद्यकीय मदत देण्यात येते .
अशोकजींनी आपल्या कला जीवनात असंख्य कलाकारांना मदत केली आहे .त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे , त्यांचे कलाकारांना मार्गदर्शन करणे आणि सोबत काम करत असणाऱ्या कलाकाराला आत्मविश्वास वाढण्यास मदत करणे! या त्यांच्या अनमोल कामगिरीमुळे अनेक कलाकार त्यांना आपल्या गुरुस्थानी मानतात.
त्यामुळेच हे हरहुन्नरी व्यक्तिमत्व अभिनय क्षेत्रातील स्वतः ‘अभिनयाचे गुरुकुल’ ठरले आहे असे म्हटले तर वावगे ठरू नये . रसिक मान्यता, राजमान्यता मिळवूनही सातत्याने पन्नास वर्ष कसदार अभिनय करणारा हा कलाकार,आजही ही नम्र आणि आणि पाय जमिनीवर ठेवून नाट्य आणि चित्रपट क्षेत्राची सेवा करण्यास सज्ज आहे!