
बविआच्या सर्वेसर्वाच्या नावाने आहे हे नवजीवन येथील मैदान

नालासोपारा :- वसई तालुक्यात मुलांसाठी खेळाच्या मैदानाची वानवा असताना वसईच्या वालीव येथील नवजीवन येथे असलेले एकमेव आप्पा मैदानही पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. त्यामुळे एक चांगलं मोठे मैदान भुमाफियांच्या घशात घालण्याची तयारी सुरू असल्याचे दिसून येत आहे.
तत्कालीन वालीव ग्रामपंचायतीने आपल्या परिसरात एक चांगले मैदान असावे या उद्देशाने नवजीवन येथे सपाटीकरण करुन एक भव्य मैदान बनवले. त्या मैदानाचे आमदार हितेंद्र ठाकूर आप्पा मैदान असे नामकरण केले. भविष्यात क्रिकेट सह क्रीडाभवन, स्टेडियम बनवून स्विमिंग, बॅडमिंटनसारखे इनडोअर गेम एकाच छताखाली खेळता येतील इतकी आप्पा मैदानाची भव्यता आहे. मात्र मनपा स्थापनेनंतर भुमाफियांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून परिसरातील शासकीय जागा बळकावून अतिक्रमण केल्यानंतर आता त्यांनी आप्पा मैदानाला लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षापासून मैदानाच्या सभोवती अनधिकृत बांधकामाचा विळखा वाढला आहे. इतकेच नव्हे तर मैदानाच्या बाजूला असलेल्या कंपन्यांनी सांडपाण्यासाठी मैदानातून गटार बनविले आहे. तसेच काही कंपन्यातून मैदानावरच कचरा टाकला जात आहे. काही कंपन्यांनी मैदानाच्या भिंतीला लागून बेकायदेशीर पत्राच्या शेड बांधल्या आहेत. मात्र मनपा अधिकारी याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला जात आहे. तसेच या आप्पा मैदानावर मुले सतत क्रिकेट व मैदानी खेळ खेळत असतात, असे असतानाही मनपातर्फे हे मैदान महिना-दीड महिन्यासाठी आनंद मेला व लग्नासाठी भाड्याने देण्यात येते. एकूणच पालिका अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे भविष्यात एक चांगल्या मैदानास मुलांना व नागरिकांनाही मुकावे लागेल अशी श्यक्यता वर्तविली जात आहे. मात्र बविआच्या सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूरांच्या नावाने असलेल्या या आप्पा मैदानावरील अतिक्रमणाबाबत बविआचे स्थानिक नेतेही गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.