
प्रतिनिधी : वसईतील मधुबन येथील जमीन खरेदीत किरीट सोमय्या यांचा मुलगा भागीदार असलेल्या कंपनीने फार मोठा गैर व्यवहार केल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसई गोखिवरे येथे मधुबन परिसरात निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने गृह प्रकल्पाकरिता कवडीमोल भावाने भूखंड खरेदी केला आहे. या व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे. सदर प्रकल्पाच्या जमीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार झाला असून ४०० कोटींची जमीन ४ कोटीमध्ये खरेदी केली जाते. सदर।व्यवहारात शासनाचा महसूल बुडवून विकासक कंपनीने शासनाची फसवणूक केली आहे. निकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीत किरीट सोमय्या यांचा मुलगा नील हा राकेश वधावन यांच्या सोबत भागीदार आहे. राकेश वधावन हा पंजाब नेशनल बैंक घोटाळा प्रकरणी तुरुंगात आहे. राकेश वधावन यांचे अनेक घोटाळे उघडकीस येणार आहेत. बैंक घोटाळ्यातील पैसा सदर प्रकल्पात लागला असल्याचा आरोप खा. संजय राऊत यांनी केला आहे.
या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची परवानगी नसून पर्यावरण विभागाने यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी. राकेश वधावन यांनी भारतीय जनता पक्षाला २० कोटी रुपये देणगी दिल्याचे पुरावे ही सादर केले आहेत.
सदरच्या गैर व्यवहार प्रकरणी सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी खा. संजय राऊत यांनी केली आहे.