
● वर्दीतल्या माणसांच्या नोंदी
सदानंद दाते हे पोलीस खात्यातील प्रामाणिक, शिस्तप्रिय तसेच सौजन्यशील अधिकारी म्हणून ओळखले जातात. सर्वसामान्यांना त्यांची ओळख झाली ते मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी अतिरेक्यांशी सामना करणारे धाडसी हिरो म्हणून… त्यांनी लिहिलेलं वर्दीतल्या माणसांच्या नोंदी हे पुस्तक नुकतंच प्रसिध्द झालं आहे. दाते सर पुस्तक काढणार हे समजल्यापासून कधी एकदा वाचतो असं झालं होतं. (योगायोगाने दाते सरांना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनीच मला ते पुस्तक भेट म्हणून दिलं. दोन दिवसात ते पुस्तक वाचून काढलं.)
सदानंद दाते हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी आहेत. मात्र त्यांच्या स्वभावात, वागण्यात कधीच त्याचा बडेजाव नसतो. सर्वसामान्यांशी वागतानाही ते तेवढेच नम्र असतात. त्यांच्या या नम्रतेची प्रचिती या पुस्तकाच्या पहिल्या पानाापासून येते. खरंतर स्वत:चा उदोउदो करण्यासाठी, स्वत:चा मोठेपणा मिरविण्यासाठी त्यांच्याकडे अगणित उदाहरणं होती. परंतु ते त्यांनी कटाक्षाने टाळलं आहे. (म्हणजे अगदी युपीएससी उत्तीर्ण झाले ते त्यांनी अगदी एका वाक्यात सांगितलं आहे. नाहीतर युपीएससी कसा उत्तीर्ण झालो त्यावरच इतरांप्रमाणे एक पुस्तक तयार झालं असतं.)
घरोघरी वर्तमानपत्र टाकणारा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ते आयपीएस अधिकारी असा हा थक्क करणारा प्रवास आहे. मराठी माध्यमातून शिकताना इंग्रजीचा बाऊ न करता त्यावर केलेली मात, भरकटत जाणार्या आयुष्याला दिलेली दिशा आणि पुढे आदर्श नितीमूल्यांवर केलेली सेवा हे या पुस्तकातून दिसतं. आपल्या संघर्षाचं मार्केटींग त्यांनी कुठेही केलेलं नाही किंवा मी किती मोठा आहे हे जाणवू दिलेलं नाही.
पोलीस खात्यात आलेले अनुभव, वेगवेगळे प्रसंग त्यावर त्यांनी केलेली मात हे प्रामुख्याने या पुस्तकातून वाचायला मिळतं. दातेसरांवर वाचनातून संस्कार रुजले. विनोभा भावे यांच्या आदर्शांचा जीवनावर प्रभाव पडला. पोलीस खात्यात काम करताना त्यांनी जीवनातील आदर्श मूल्यांना कधीही तिलांजली दिली नाही. त्यामुळे पोलीस दलाच्या नोकरीच्या सहाव्याच दिवशी बदली झाली होती. तत्वांशी, कामाशी प्रामाणिक राहणे हे दाते यांचे स्वभाव वैशिष्ट्य. प्रसंगी सहकार्यांशी, वरिष्ठांशी संघर्ष केला. पोलीस खात्यात आमूलाग्र बदल केले, नवनवीन संकल्पना रुजवल्या आणि आजही ते नवनवीन उपक्रमांचे ‘शिल्पकार’ मानले जातात. मुंबई हल्ल्यानंतर दहशतवाद्यांशी लढण्यासाठी क्विव रिस्पॉन्स टिम असो वा फोर्स वन दलाची स्थापना. दातेसरांची भूमिका महत्वाची होती. दहशतवाद विरोधी कक्ष (एटीसीसेल), सदोष मनुष्यवध शाखा (होमिसाईड ब्रांच) या संकल्पना दाते यांच्याच आहेत.‘फोर्स वन’ च्या प्रमुख पदी राहून त्यांनी तो उभा केला, कणखर बनवला. दातेसर हे पोलीस कर्मचार्यांचाही आदर करतात. त्यांच्या अनुभवाने तयार झालेल्या सुचना ऐकतात आणि त्याचा कसा फायदा झाला ते त्यांनी पुस्तकात सांगितले आहे. (आजही दाते यांनी दोन पोलीस ठाण्यांची उद्घघाटने पोलीस कर्मचार्यांच्या हस्ते केली आहेत)
कठीण प्रसंगी जेव्हा कसोटी लागते अशा वेळी विपश्यनामुळे कसा फायदा झाला ते त्यांनी सांगितलं आहे. आदर्श नितीमूल्ये प्रत्यक्ष आचरणात आणली आणि आदर्शवत जीवन कसे जगता येते याचा परिपाठ त्यांनी घालून दिला. २६/११ च्या वेळी जखमी असताना पोलीस कुमक येईपर्यंत संयमाने धीराने परिस्थितीला तोंड देऊ शकले ते फक्त या विपश्यनेमुळेच…
पोलीस दल सक्षम करायचं असेल तर त्यासाठी नवनवीन तंत्रज्ञान आणि संशोधनाची गरज आहे. हे ओळखून दाते सरांनी २००४ मध्ये हंफ्री फेलोशिप मिळवून अमेरितून आर्थिक गुन्हे आणि संघटीत गुन्हेगारी यावर संशोधन केले. मिनेसोटा विद्यापीठात ‘फिलॉसॉफी ऑफ लॉ’ अभ्यासक्रम पुर्ण केला. त्यापूर्वी त्यांनी तपासाचे व्यवस्थापन या विषयात पीएचडी मिळवली.
पोलीस खात्यात आलेल्या प्रत्येक पोलीस अधिकार्यांनी हे पुस्तक अभ्यास म्हणून वाचायला हवं. गर्दीचे नियोजन कसे करावं? बंदोबस्त कसा असावा आदींबाबत त्यांनी अनेक उदाहरणातून सांगितलं आहे. जे पोलीस पुस्तक वाचतील त्यांना आपल्या कार्यकाळात त्याचा निश्चित उपयोग होईल.
एरवी पोलीस खात्याची भाषा रुक्ष असते. मात्र या पुस्तकात ओवघत्या शैली आहे. त्यामुळे पुस्तक वाचकांना खिळवून ठेवते. सदानंद दाते या वरिष्ठ पोलीस अधिकार्याचे अंतरंग उलगडवून दाखविणाऱ्या या पुस्तकातून वाचकांना अनेक प्रकारची माहिती मिळतेच शिवाय जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन देखील सकारात्मक होतो.
- सुहास बिर्हाडे
पुस्तक- वर्दीतल्या माणसांच्या नोंदी
लेखक- सदानंद दाते, पोलीस आयुक्त
प्रकाशन- समकालीन प्रकाशन
किंमत- २०० रुपये