
पेव्हर ब्लॉक उखडले, झाडांची नासधूस ;देखभालीकरताचे 70 हजार रुपये पाण्यात ?

प्रतिनिधी
विरार- वसई-विरार महापालिकेच्या वसई-तामतलावाची सध्या दुर्दशा झाली आहे. या तलावासभोवती काही महिन्यांपूर्वी लावण्यात आलेले पेव्हर ब्लॉक उखडले असून, झाडांचीही नासधूस झाली आहे. उद्यानात अस्वच्छता पसरली आहे. या उद्यानाची देखभाल करण्यास ठेकेदार असमर्थ ठरत असल्याने त्याच्याऐवजी अन्य ठेकेदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने या उद्यानाच्या देखभालीचे काम महिला बचत गटाला दिले आहे, मात्र या बचत गटाने हे काम विकास राऊत व समीर वसईकर या दोघांना सोपवले आहे. या कामाकरता या दोघांना 70 हजार रुपये इतके मानधन मिळते. या दोघांनी या उद्यानातील झाडांना सकाळ-संध्याकाळ पाणी घालण्याकरता 15 हजार रुपये पगारावर एक व्यक्ती नेमली आहे. त्यानंतरही या उद्यानाची देखभाल होत नसल्याची तक्रार वसई भाजप अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष तसनीफ नूर शेख यांनी केली आहे.
वसई पश्चिमेला असलेल्या तामतलाव परिसरात सकाळ-संध्याकाळ शेकडो नागरिक प्रभात फेरी आणि व्यायामाकरता येतात. तलाव परिसरातील उखडलेले पेव्हर ब्लॉक पाहता उद्यानात येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांना धोका संभवतो. शिवाय पालिकेकडून ठेकेदारावर 55 हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च होत असतानाही उद्यानाची देखभाल योग्य प्रकारे होत नसल्याचे शेख यांनी निदर्शनास आणले आहे. त्यामुळे या उद्यानाच्या देखभालीकरता योग्य ठेकेदाराची नियुक्ती करावी, अशी मागणी तसनीफ शेख यांनी केली आहे.
….
● याबाबत आपण वसई-विरार महापालिकेच्या प्रभारी सहाय्यक आयुक्तांना पत्र दिलेले आहे. या पत्रातून त्यांच्या सर्व बाबी निदर्शनास आणल्या आहेत. उद्यानाची देखभाल व्यवस्थित होत नसल्याने अन्य ठेकेदार नियुक्त करावा, अशी मागणी आम्ही केलेली आहे.
–तसनीफ शेख, वसई भाजप अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष
….
● इंजीनियर मार्फत उद्यानाची पाहणी करून घेतो. त्यानंतर आपल्याला माहिती देतो.
- प्रदीप आवडेकर, प्रभारी सहाय्यक आयुक्त, वसई-विरार महापालिका आय प्रभाग
….