
प्रतिनिधी : पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील खानिवडे येथे अवैध उत्खनन करून स्वामित्वहक्क चुकवून शासनाची फसवणूक करण्याचे प्रकरण उघडकीस आले असून महसूल प्रशासनाने सदर प्रकरणी कारवाई करावी.
या बाबतची अधिक माहिती अशी की, पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील खानिवडे गट क्र. ६०/१ येथे अवैध उत्खनन करून स्वामित्वहक्क चुकवून शासनाची फसवणूक होत असल्याचे प्रकरण बोईसर मंडळ अधिकारी व त्यांच्या पथकाने टाकलेल्या धाडीत उघड झाला आहे. पालघर प्रांत अधिकारी यांच्याकडून आदिवासी खातेदार असलेल्या जागेवर उत्खननासाठी नियमबाह्य परवानगी घेऊन दुसऱ्या ठिकाणाहून मुरूमाचे उत्खनन सुरू होते. हा मुरूम वाणगाव डहाणू भागात रेल्वेच्या भरावाच्या कामाकरिता पाठविला जात होता. बोईसर महसूल विभागाने घटनास्थळी धाड टाकून मोठी कारवाई केली.
रेल्वे कॉरिडॉरच्या कामात मुरूम भरावाचा ठेका एनजी प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीने घेतला असून त्या करिता मौजे राणीशिगाव येथील गट क्र. ५४ या आदिवासी खातेदार जगन्नाथ चिंटू माळकरी यांच्या जागेतील मुरूम उत्खननाचा स्वामित्वहक्क परवाना घेतला होता. मात्र सदर जागेवर उत्खनन न करता त्या गावात पुढे ५ किलो मिटर अंतरावर असलेल्या खानिवडे गावातील गट क्र. ६०/१ प्रमोद चिखलीकर यांच्या मालकी जागेतून उत्खनन करून चोरट्या पद्धतीने हायवा ट्रकने वाहतूक केली जात होती. पोकलेन मशीनचा वापर करून मागील १५ ते २० दिवसापासून बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले गेले आहे.
स्वामित्वहक्क चुकवून शासनाची फसवणूक करण्याचे अनेक प्रकार उघडकीस येत असून महसूल प्रशासनाचे महा भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संरक्षणात अवैध उत्खननाचा खेळ खेळला जात आहे. सदर प्रकरणी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई व्हावी.